मंजुळा शेट्ट्ये हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या सहा जणींपैकी, एकीने मंजुळाला केलेल्या अमानुष मारहाणीचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याची माहिती समोर येत आहे. तिच्यासह जेलमधील अन्य कर्मचाऱ्यांनीही मंजुळाला वाचविण्याऐवजी तिची मारहाण मोबाइलमध्ये कैद केल्याचे समजते. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
वर्चस्वाच्या अहंकारातून, तसेच अन्य कैद्यांसमोर दहशत निर्माण करण्यासाठी, जेलर मनीषा पोखरकर, पोलीस शिपाई बिंदू नाईकडे, आरती शिगणे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळव यांनी वॉर्डन मंजुळाला जीवघेणी मारहाण केली. सहकैदी मरियम शेखने दिलेल्या जबाबानुसार, २३ जून रोजी तिला दोन अंडी आणि तीन पावांच्या हिशोबासाठी मारहाण सुरू झाली. तिला सुरुवातीला पॅसेजमध्ये मारहाण केली. त्यानंतर, कैद्यांसमोर दहशत निर्माण करण्यासाठी तिला ओढत बॅरेकमध्ये नेऊन मारहाण केली. तेथे तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत, नग्न करण्यात आले. या वेळी बिंदू आणि सुरेखा हिने तिचे दोन्ही पाय पकडले. त्यानंतर, वसीमाने तिच्या गुप्तांगात काठी घातली. तेथून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. तरीही सहाही जणांकडून तिला अमानुष मारहाण सुरू असल्याचे मारियमने जबाबात सांगितले आहे.
याच अमानुष मारहाणीचे या सहा जणींपैकी एकीने मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. मंजुळाच्या वेदनेने कारागृह हादरून गेले असताना, यातील एका आरोपीने याच्या चित्रीकरणाचा आनंद घेत असल्याची माहिती समोर येत आहे. तिच्यासह कारागृहातील अन्य कर्मचाऱ्यांनीही याचे चित्रीकरण केल्याची माहिती सूत्रांकडून समजते. सहाही आरोपींच्या मोबाइलमधील डाटा मिळविण्यासाठी गुन्हे शाखेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
मंगळवारी याच्या माहितीसाठी कारागृहातील एका अधिकाऱ्याचा जबाबही नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे ती आरोपी कोण, तिने तो व्हिडीओ आणखी कोणाला शेअर केला का? अशा अनेक प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत. हा व्हिडीओही या गुन्ह्यांत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. त्या दिशेने पोलीस अधिक तपास करत आहेत.
वर्षानुवर्षे तेथेच… तीन वर्षांनंतर बदलीचा नियम असतानाही, पात्रता नसतानाही अनेक अधिकारी वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे कारागृहात तळ ठोकून आहेत. यामध्ये भायखळा, आर्थर रोड मध्यवर्ती कारागृह, ठाणे, तळोजा कारागृहात हे चित्र पाहावयास मिळत आहे. बदलीचे पत्र येऊनदेखील मंडळी खुर्ची सोडण्यास तयार नसल्याचेही समोर येत आहे.
भायखळा कारागृहात जेलर आणि अधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीत मंजुळाचा बळी गेला. या दरम्यान अनेक नवे खुलासे समोर आले. आजवर अनेक अधिकारी पात्रता नसताना खुर्चीवर बसून आहेत. फक्त वरिष्ठांच्या मर्जीतले असल्यामुळे त्यांचे फावते. याच साखळीचा फटका आम्हा कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या दरम्यान भायखळा कारागृहाचे अधीक्षक इंद्रमणी इंदुरकर हे गेल्या साडेचार वर्षांपासून भायखळा कारागृहात आहेत. मंजुळा शेट्ट्ये हत्याप्रकरणात त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यात १६ डिसेंबर २०१३ मध्ये त्यांची औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात बदली करण्यात आली होती. मात्र, अजूनही ते भायखळा कारागृहातच आहेत. याबाबत इंदुरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
