डहाणूच्या दोन भाविकांचा मृत्यू

अनंतनाग येथे सोमवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या अमरनाथच्या सात यात्रेकरूंमध्ये डहाणूचे दोन भाविक असून जखमींमध्ये डहाणूमधील चार व कासा येथील दोन भाविकांचा समावेश आहे. निर्मलादेवी ठाकूर व उषा सोनकर अशी मृतांची नावे असून ठाकूर या आशागढ येथील संतोषी परिसरात तर सोनकर या डहाणू स्टेशन परिसरात राहत होत्या. सहा जखमींमध्ये कासा येथील यशवंत व योगिता डोंगरे या दाम्पत्यासह पुष्पा गोसावी (रामवाडी), प्रकाश वजानी (पटेलपाडा), हेमा वजानी (पटेलपाडा), गीताबेन रावळ (इराणी रोड) यांचा समावेश आहे. योगिता यांच्या पायाला तर यशवंत यांच्या कमरेत गोळी लागली आहे. यशवंत यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांच्या व योगिता यांच्या जीवाला आता कोणताही धोका नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मृतांचे पार्थिव व जखमींना मंगळवारी विमानाने सुरतला आणले गेले. तेथून दोघींचे पार्थिव हेलिकॉप्टरने डहाणूला दुपारी चारच्या सुमारास आणले गेले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी पहाटे डहाणूत येऊन मृतांच्या व जखमींच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

या घटनेचे वृत्त कळताच मृतांच्या व जखमींच्या कुटुंबियांच्या घरी सांत्वन करणाऱ्यांची रीघ लागली होती. त्यामुळे डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी शांतता राखण्यासाठी तलासरी, वाणगाव, घोलवड, कासा येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविली होती. शिवाय ‘सीआरपीएफ’च्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या.

पालघरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, डहाणूच्या प्रांताधिकारी आंचल गोयल, तहसीलदार प्रीतिलता कौरथी- माने यांनीही मृतांच्या आप्तांचे सांत्वन केले.

सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास उषाबेन सोनकर यांनी पती मोहन यांच्याशी फोनवर संपर्क साधून दिवसभर घडलेल्या घटनांची माहिती दिली होती.

रात्री ८.३० वाजता पुष्पा गोसावी यांनी डहाणूतील दिलीप शेट्टी यांना दहशतवादी हल्ल्याची माहिती देऊन निर्मलादेवी ठाकूर व उषाबेन सोनकर मृत झाल्याचे सांगितले.

शेट्टी यांनी या हल्ल्याची माहिती सोनकर कुटुंबियांना दिली. उषाबेन यांच्या पश्चात पती मोहन सोनकर, ४ मुली व मुलगा असा परिवार आहे.

निर्मलादेवी ठाकूर यांचा मुलगा प्रदीप यांना मंगळवारी पहाटे पाच वाजता ‘बीएसएफ’कडून घटनेची माहिती देण्यात आली. निर्मलादेवी यांच्या पश्चात पती भरतसिंग ठाकूर, मुलगा प्रदीप व मुलगी नीतू असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *