रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. एका वेबसाइटने सुमारे १२ कोटी जिओ ग्राहकांचा डाटा हॅक केल्याचा दावा केला आहे. magicapak.com नावाच्या वेबसाइटवर जिओ ग्राहकांचा डाटा हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, हे वृत्त खरे आहे की, नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. रविवारी या वेबसाइटविरोधात तक्रार केल्यानंतर ती बंद करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान, रिलायन्सने असे काही झाल्याचे वृत्त नाकारले आहे. डाटा हॅकिंगचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा प्रकार असल्याचेही बोलले जात आहे.
या वेबसाइटने सर्व १२ कोटी ग्राहकांचा डाटा अपलोड केला होता किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जेव्हा या वेबसाइटवर काही जुने क्रमांक टाकण्यात आले. तेव्हा त्या क्रमांकांशी निगडीत ग्राहकाच्या ओळखीशी संबंधित माहिती समोर आल्याचा दावा माध्यमातून केला जात आहे.
या वेबसाइटवर दिसत असलेला डाटा हा अधिकृत नाही. आम्ही याबाबत कायदेशीर संस्थेस माहिती दिल्याचे जिओच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. ते म्हणाले, ग्राहकांच्या डाटाबाबत वेबसाइटवर केला जात असलेला दावा खोटा आहे. आम्ही याची चौकशी करत आहोत. आतापर्यंतच्या आमच्या चौकशीत वेबसाइटने जारी केलेला डाटा हा चुकीचा आहे. ग्राहकांचा डाटा सुरक्षित असून आवश्यक त्या ठिकाणी त्यांच्या डाटाचा उपयोग केला जातो. त्यामुळे ग्राहकांनी काळजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. या वेबसाइटविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
टेक वेबसाइट फोन एरिनाचे प्रमुख वरूण कृष्णन यांनी यासंबंधी ट्विट केले आहे. जिओच्या १२ कोटी ग्राहकांचा डाटा लीक होणे हा भारताला मोठा धक्का आहे. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा डाटा हॅक घोटाळा असू शकतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
