नागपुरातील वेणा जलाशय दुर्घटनेपूर्वी तरुणांनी केलं होतं फेसबुक लाईव्ह

नागपूरमधील वेणा जलाशयात बोट उलटल्यानं रविवारी 11 तरुण बुडाले आहेत. यातील तीन तरुणांना वाचवण्यात यश आले आहे. यात दोन नाविकांसह एक पर्यटक तरुणाचा समावेश आहे. दरम्यान, एकाचा मृतदेह सापडला आहे, राहुल जाधव असे या तरुणाचं नाव आहे. अन्य तरुणांचा  शोध  सुरू आहे.
दरम्यान, ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तरुणांनी फेसबुक लाईव्ह केले होते. सहलीचा कसा आनंद घेत आहेत याची माहिती बोटीतील हे तरुण फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या मित्रांना सांगत होते.  यावेळी काही जणांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. शिवाय, एवढे जण एका बोटीत कसे बसले आहात, असा प्रश्न उपस्थित करत भीतीदेखील व्यक्त केली होती.
काही वेळानं ही बोट उलटून दुर्घटना घडली ज्यात 11 जण बुडाले. यातील तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. रविवारी (9 जुलै) संध्याकाळी ही दुर्घटना घडल्यानं अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.
नेमकी काय आहे घटना ?
अमरावती महामार्गानजीक असलेल्या वेणा जलाशयात रविवारी संध्याकाळी सहलीसाठी गेलेल्या तरुणांचे सेल्फी काढणं जिवावर बेतले आहे. बोटीतून प्रवास करताना एकाच बाजूला अधिक भार झाल्यामुळे डोंगा असंतुलित होऊन उलटली. परिणामी 7 जणांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त आहे. या नावेत नाविकांसहीत एकूण 11 जण होते.
कळमेश्वर पोलिसांना या दुर्घटनेची माहिती तब्बल दोन ते अडीच तास उशिराने मिळाली. पण त्यांनी लागलीच बचावकार्य सुरू केले. आजूबाजूच्या गावातील मच्छीमार तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. रात्री 9.30 वाजेपर्यंत तीन जणांना वाचवण्यात त्यांना यश आले.
 आठवा मैल वाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणारे अमोल मुरलीधर दोडके (28), रोशन मुरलीधर दोडके, राहुल जाधव, अंकित अरुण भोसकर (22), परेश काटोके, अतुल भोयर, पंकज डोईफोडे, प्रतीक आमडे, रोशन ज्ञानेश्वर खांदारे (23) आणि अक्षय मोहन खांदारे हे रविवारी पिकनिकसाठी धामणाजवळच्या वेणा जलाशय परिसरात गेले होते. सायंकाळी 6.30च्या सुमारास अतुल ज्ञानेश्वर बावणे (22) याच्या नावेत ते बसले. जलाशयाच्या मधोमध गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात सर्व जण एकाच बाजूला जमले. परिणामी नावेचे संतुलन बिघडले आणि नाव उलटली. अतुल बावणे याला पोहता येत होते. अन्य कुणालाही पोहता येत नसल्याने अतुल वगळता इतर 10 जण जलाशयात बुडाले.
शोधकार्य सुरू 
अतुल काठावर आल्यानंतर त्याने इतरांना नाव उलटून तरुण बुडाल्याची माहिती दिली. अंधारामुळे बचावकार्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. तरीही पोलीस आणि प्रशासनाच्या ताफ्याकडून रात्रीपासून शोधकार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *