पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या वादातून पतीने पत्नीसह मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कान्हे फाटा येथे घडली आहे. रजनी सातकर असे मृत महिलेचे नाव असून अनुष सातकर असे मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी वसंत सातकर याला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनी सातकर (वय ३८ ), अनुष सातकर (वय १३) मुलगी श्रावणी सातकर (वय ९) आणि वडील वसंत सातकर (वय ४०) हे सर्व रात्रीच्या वेळी घरी असताना पत्नी रजनी आणि पती वसंत यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. शाब्दिक वाद टोकाला गेला.
राग अनावर झालेल्या वसंत याने ऊस तोडण्याच्या चॉपरने पत्नी आणि मुलाची हत्या केली. पत्नीला मारत असताना मुलगी श्रावणीने आरडा ओरडा केला त्यामुळे शेजारी राहणारे गणेश आंबेकर हे भांडण सोडवण्यासाठी आले. तसेच मुलगी श्रावणी देखील वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र पत्नीवर सपासप वार करत पत्नीची हत्या केली. झटापटीत शेजारी राहणारे गणेश आंबेकर आणि मुलगी श्रावणी जखमी झाली आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र श्रावणीने आरडाओरडा केला नसता तर कदाचित तिची देखील हत्या झाली असती.त्यामुळे वसंतने कुटुंब संपवण्याचा निर्धार केला होता असच म्हणावे लागेल.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मध्यरात्री दीड ते दोन च्या सुमारास हा प्रकार घडला. वसंत सातकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
