२१५पैकी ११३ केंद्रांचे अन्नदाता आहार योजनेत रूपांतर
राज्यातील तत्कालीन शिवसेना आणि भाजप युती सरकारच्या ‘झुणका भाकर केंद्र’ योजनेला मुंबई महापालिकेने नवसंजीवनी दिली असून पालिकेच्या जागेवरील २१५ पैकी ११३ झुणका भाकर केंद्रांचे रूपांतर अन्नदाता आहार योजनेमध्ये करून बेरोजगारांना रोजगाराचा मार्ग खुला करून दिला आहे; तर उर्वरित १०२ झुणका भाकर केंद्रेही लवकरच या योजनेत समाविष्ट करण्यात येतील.
शिवसेना आणि भाजप युती महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर १९९५ मध्ये गरिबांच्या मुखी पोषक आहार लागावा आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने झुणका भाकर केंद्र योजना सुरू करण्यात आली. साधारण १० वर्षे ही योजना सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्रे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. झुणका भाकर केंद्र चालकांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयांनी त्यांची विनंती फेटाळून लावली. अखेर ही योजना बंद झाली आणि विविध यंत्रणांनी या केंद्रांसाठी दिलेली जागा परत ताब्यात घेतली.
पालिकेच्या ठिकठिकाणच्या २१५ जागांवर झुणका भाकर केंद्रे उभी होती. त्यात पदपथ, पिझेहाटीच्या जागा, रस्ते, सार्वजनिक जागा, सार्वजनिक आरक्षणे असलेल्या ठिकाणी ही केंद्रे उभी होती. पालिकेने झुणका भाकर केंद्रांची योजना केंद्रांच्या जागा संबंधित संस्थांच्या ताब्यात ठेवाव्यात अशी आग्रही मागणी २००७ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. त्यास तत्कालीन विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे पालिका सभागृहाने एकमताने ही मागणी मंजूर करून पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविली होती. त्यानंतर नगरसेवकांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार पालिका प्रशासनाने झुणका भाकर योजनेला पर्याय म्हणून अन्नदाता आहार योजना सुरू करण्याची तयारी १२ मे २००८ मध्ये दर्शविली. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात यावी, असेही नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला सूचित केले होते. या संदर्भातील पालिका आयुक्तांचा अभिप्राय ५ जुलै २०१७ रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने सादर केला.
मुंबईमधील २१५ झुणका भाकर केंद्रे पालिकेच्या जागेवर होती. त्यामध्ये नागरिकांना अडथळा ठरणार अशा ४४ झुणका भाकर केंद्रांचे अन्नदाता आहार केंद्रामध्ये रूपांतर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी ६९ झुणका भाकर केंद्रांचे रूपांतर अन्नदाता आहार योजनेत करण्यात आले. आजघडीला एकूण ११३ झुणका भाकर केंद्रांचे रूपांतर नव्या योजनेत झाले आहे. उर्वरित १०२ झुणका भाकर केंद्रांचे टप्प्याटप्प्याने अन्नदाता आहार योजनेत रूपांतर करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिले.
शिव वडापावचा विसर
झुणका भाकर केंद्रांचे रूपांतर अन्नदाता आहार योजनेत करतानाच मुंबईत १२५ शिव वडापावच्या हातगाडय़ा सुरू करण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले होते. मात्र शिव वडापावच्या गाडय़ांबाबत प्रशासनाने अद्याप धोरणच आखलेले नाही. त्यामुळे आजघडीला मुंबईत शिव वडापावच्या अनधिकृत हातगाडय़ा उभ्या आहेत. स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी केवळ झुणका भाकर केंद्रांबाबत प्रशासनाला जाब विचारला. परंतु त्याच वेळी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिव वडापावचा मात्र विसर पडला होता. शिव वडापावच्या हातगाडय़ांचा प्रश्न अधांतरितच राहिला आहे.
