कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. 1 जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. या संपादरम्यान वेगवेगळ्या मार्गानं सरकारविरोधात आंदोलन करत शेतकरी आपला रोष व्यक्त करत आहे.
बीड जिल्ह्यातील त्र्यंबक तोडकर हा शेतकरीदेखील हातात फास घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढला. यावेळी त्यांनी कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचीही मागणी केली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
सुदैवानं काँग्रेसचे नेते विठ्ठल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला व इतरांच्याही नजरेस आणून दिला. यामुळे अनर्थ टळला.
विठ्ठल जाधव यांनी तोडकर यांनी खाली येण्यास विनंती केली. पण सुरुवातीला त्यांनी नकार देत प्रशासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. यानंतर काही वेळानं तेथे महसूल विभागाचेही कर्मचारी दाखल झाले. ब-याच प्रयत्नानंतर व विनवणी केल्यानंतर अखेर त्र्यंबक तोडकर झाडावर खाली उतरले व सर्वांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान, शेतकरी संपाची ऐतिहासिक हाक देऊन संपूर्ण राज्य ढवळून काढलेल्या पुणतांब्यातील (जि. नगर) शेतकऱ्यांनी बुधवारी मूकमोर्चा काढून आंदोलनाचा पहिला टप्पा संपल्याचे जाहीर केले.
