पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 2500 रुपयांमध्ये दिल्ली ते शिमला या विमान प्रवासाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानंतर आता कडप्पा ते हैदराबाद आणि नांदेड-हैदराबाद अशा उड्डाण सेवांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या छोट्या शहरांमधील पर्यटन केंद्रही आता विमान प्रवासानं जोडली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेचा शुभारंभ हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमलातून केला आहे. छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेचा हा एक भाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताकडे हायड्रो पॉवर मोठ्या प्रमाणात असून, जगात भारताचा वेगानं विकास होतोय. देशाच्या एकतेसाठी हवाई सेवा गरजेची आहे. छोट्या शहरांना जोडण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या विमान सेवेमुळे गुंतवणूक वाढणार असून, विमान प्रवासात आता चप्पल घालणारे लोकही पाहायला मिळतील. तरुणांना संधी दिल्यास देशाचा चेहरा बदलेल. हवाई संपर्क नसलेली 128 शहरं या योजनेद्वारे जोडली जाणार आहेत. त्याप्रमाणेच परवडणा-या किमतीत हवाई प्रवास शक्य होणार आहे.
एअर इंडिया, स्पाईस जेट, एअर डेक्कन, एअर ओडिशा आणि टरबो मेघा या पाच हवाई कंपन्या 128 मार्गांवर विमान सेवा सुरू करणार असून, मध्यमवर्गीय जनतेला त्याचा फायदा होणार आहे. या योजनेत महाराष्ट्रातील पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या विमान प्रवासानुसार तासाभराच्या प्रवासासाठी 2500 रुपये आकारण्यात येतील. विमान प्रवासाच्या 500 किलोमीटरच्या एका तासाच्या प्रवासाला 2500 रुपये आकारले जाणार आहेत. तसेच हेलिकॉप्टरच्या 30 मिनिटांच्या हवाई प्रवासालाही 2500 रुपये मोजावे लागणार आहेत.
दरवर्षी मुंबईसह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक कुलू-शिमला या थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी जातात. सध्या कुलू-शिमला येथे थेट विमानाने जाता येत नाही. दिल्ली किंवा चंदीगडपर्यंत विमानाने गेल्यानंतर तिथून पुढे रस्ते मार्गाने कुलू-शिमल्यापर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नव्या सुविधेचा पर्यटकांना फायदा होणार असून, त्यांचा वेळ वाचणार आहे. नांदेड-मुंबई, नांदेड -हैदराबाद, नाशिक- मुंबई, नाशिक-पुणे, कोल्हापूर -मुंबई, जळगाव -मुंबई आणि सोलापूर-मुंबई उड्डाण योजनेच्या माध्यामांतून ही विमान सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.