शौचालयात घुसून महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील ही घटना आहे. खासगी कंपनीत काम करणारी 26 वर्षीय तरुणी शौचालयात गेली असता एक तरुण तिथे लपून मोबाईल फोनच्या सहाय्याने आक्षेपार्ह फोटो घेत असल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर तरुणीने पुणे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या ‘बडी कॉप’ अॅपच्या सहाय्याने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. राजकमल यादव असं या आरोपीचं नाव असून तो मुळचा बिहारचा आहे.
तरुणी वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील कॉमर्स सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीतील एचआर विभागात काम करते. ‘कंपनीची महत्वाची मीटिंग असल्याने महिला कर्मचा-यांसहित सर्वांनाचा उशिरापर्यंत थांबायचं होतं. रात्री 9.45 दरम्यान तरुणी वॉशरुममध्ये गेली. महिला वॉशरुममध्ये गेली असता कोणीतरी आपल्याला लपून पाहत असल्याचा भास झाला. तिने पाहिलं असता राजकमल यादव तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथरुडकर यांनी दिली आहे.
अनिल पाथरुडकर यांनी सांगितलं की, ‘यानंतर तरुणीने धाव घेत अलार्म वाजवण्याचा आणि ओरडत मदत मागण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तरुणीचा हात पकडत छेडण्याचाही प्रयत्न केला. कसंतरी तरुणीने स्वत:ची सुटका करुन घेतली आणि वॉशरुममधून पळून गेली. तरुणीने सुरक्षारक्षकांकडे धाव घेतली आणि सर्व प्रकार सांगितला. यानंतर बडी कॉप’ अॅपच्या सहाय्याने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.