काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सुपरस्टार विनोद खन्ना यांच्या शरीरात पाणी कमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सततच्या आजारपणामुळे त्यांच्या तब्येतीवरही परिणाम झाला होता. गेल्या आठवड्यात त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यांची खंगलेली तब्येत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एकेकाळी आपल्या धिप्पाड देहयष्टीने सर्वांना प्रेमात पाडणारे विनोद खन्ना हेच का? असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात येत होता.
त्यांची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या जेव्हा बाहेर आल्या त्यानंतर ते मृत पावल्याच्याही अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. यातच भाजपच्या मेघायलमधील नेत्याने विनोद खन्ना यांना मृत घोषित केले होते. एवढे कमी की काय त्यांनी कार्यकर्त्यांसोबत विनोद खन्नांसाठी २ मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजलीदेखील वाहिली होती.
पण, विनोद खन्ना यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचे कळताच त्यांनी माफी मागत म्हटले की, ‘आम्ही चुकून २ मिनिटांचे मौन धरले. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.’
दरम्यान, रविवारी रुग्णालय प्रशासनाने त्यांची प्रकृती पहिल्यापेक्षा उत्तम असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने मेडिकल बुलेटिनद्वारे सांगितले होते. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी त्यांची खूप चांगली काळजी घेत आहेत. त्यामुळेच त्यांच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत असल्याने लवकरच त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल, असे विनोद खन्ना यांचा मुलगा राहुलने सांगितले होते.
