राजकारणाने गाठली खालची पातळी

राजकारणाने गाठली खालची पातळी

राजकीय मंडळी स्वार्थासाठी काय करतील आणि कोणत्या थराला जातील, याचा काही नेम नाही असे म्हटले जाते. तामिळनाडूमध्ये सध्या याचाच प्रत्यय येतो आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर पक्षात फूट पडली. माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी बंड पुकारले. जयललिता यांच्या निकटवर्तीय असलेल्या शशीकला यांनी पक्षासह राज्याचे नेतृत्वदेखील स्वत:कडे घेतले. आता शशीकला आणि पनीरसेल्वम यांच्याकडून आपणच जयललिता यांचे खरे वारसदार आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. या प्रयत्नात पनीरसेल्वम गटाने अतिशय खालची पातळी गाठली आहे.

जयललिता यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आर. के. नगर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघातील निवडणूक जिंकण्यासाठी शशीकला आणि पनीरसेल्वम यांनी कंबर कसली आहे. पनीरसेल्वम यांच्या गटाने निवडणूक प्रचारासाठी प्रतिकात्मक शवपेटी तयार केली आहे. जयललिता यांच्या निधनानंतरही त्यांच्याच मतदारसंघातील निवडणुकीत पनीरसेल्वम यांच्याकडून जयललितांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला जातो आहे. जयललिता यांची अंत्ययात्रा राजाजी हॉल ते मरिना बीच यादरम्यान काढण्यात आली होती. त्याचीच आठवण प्रतिकात्मक शवपेटीच्या रुपातून करुन देत पनीरसेल्वम यांच्या गटाकडून मते मागितली जात आहेत.

पनीरसेल्वम यांच्या गटाकडून प्रचारासाठी प्रतिकात्मक शवपेटी तयार करण्यात आली आहे. या शवपेटीत जयललिता यांचा मृतदेह यांचा पुतळा ठेवण्यात आला आहे. शशीकला यांच्या चेहऱ्याजवळ म्हणजेच शवपेटीच्या एका टोकाला विजेचे छोटेसे खांब लावण्यात आले आहेत. पनीरसेल्वम यांच्या गटाला विजेचा खांब हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. त्याचा खुबीने वापर जयललिता यांच्या प्रतिकात्मक शवपेटीत करण्यात आला आहे. विजेच्या खांबामध्ये दिवे लावण्यात आल्याने त्यांचा प्रकाश जयललिता यांच्या पुतळ्यावर पडला आहे आणि त्यामुळे पुतळ्याचा चेहऱ्याकडील भाग उजळून निघाला आहे.

शशीकला आणि पनीरसेल्वम यांच्याकडून जयललिता यांच्या नावाचा पुरेपूर वापर केला जातो आहे. जयललिता जिवंत असताना त्यांच्या नावाचा, त्यांच्या प्रतिमेचा वापर अण्णा द्रमुक पक्षाकडून केला जात होता. जयललिता यांच्या मृत्यूनंतरही शशिकला आणि पनीरसेल्वम यांच्याकडून त्यांच्या नावाचा वापर करण्याची स्पर्धा सुरु आहे. आतापर्यंत मोठमोठ्या पोस्टरवर दिसणाऱ्या जयललिता यांना थेट मतांसाठी प्रतिकात्मक शवपेटीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मतांसाठी राजकारणी काहीही करु शकतात, अशी चर्चा तामिळनाडूत सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *