मुंबईवर हल्ल्याचा कट

इसिस या दहशतवादी संघटनेने मुंबईत २६/११ सारखा हल्ला घडवण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. इसिसचे तीन दहशतवादी सागरी मागार्ने मुंबईत प्रवेश करुन हल्ला घडवू शकतात अशी शक्यता तटरक्षक दलाने वर्तवली आहे. यानंतर मुंबई पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

इंडिया टुडे या इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, तटरक्षक दलाचे पथक गेल्या काही महिन्यांपासून अरबी समुद्रातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तटरक्षक दलाला मिळालेल्या माहितीनुसार इसिसचे तीन दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबईत हल्ला घडवण्याचा त्यांचा कट आहे. तटरक्षक दलाने ही माहिती अन्य सुरक्षा यंत्रणांनाही दिली आहे.

तटरक्षक दलाने मुंबई पोलिसांना सोमवारी रात्री फॅक्स पाठवला असून यामध्ये इसिसकडून हल्ला होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिका-यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पोलीस दलातील सूत्रांनी फॅक्स आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तटरक्षक दलाच्या माहितीनंतर पोलीस आणि अन्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, असे अधिका-याने सांगितले.

इसिस या दहशतवादी संघटनेने इराक आणि सीरियातील क्रूरकृत्यांनी दहशत निर्माण केली आहे. इराक आणि सीरियात इसिस विरोधात लढणा-या देशांमध्ये या संघटनेने हल्ले केले आहेत. आता या संघटनेने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांकडे मोर्चा वळवल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी भोपाळमधील पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटात इसिसचा हात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तटरक्षक दलाच्या इशा-याला पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *