उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असल्याचे डॉक्टर नेहमी सांगतात. पण सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये अनेकजण आठ तासांची झोपही पूर्ण करत नाहीत. व्हॉटस अॅप आणि फेसबुकचा अतिवापराने माणसाच्या झोपेवर परिणाम केला असून, पुरेशी झोप न मिळण्याचे ते एक प्रमुख कारण असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
व्हॉटस अॅप आणि फेसबुकवर सक्रीय असल्यामुळे तुम्ही रोज दीड तास उशिराने झोपता असल्याचे बंगळुरु स्थित नॅशनल इंस्टिटयूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सच्या संशोधनातून समोर आले आहे. इंटरनेटच्या वापरामुळे लोक ज्या प्रमाणे दीडतास उशिराने झोपतात त्याच प्रमाणे दीड तास उशिरानेच उठत असल्याचे सर्विस फॉर हेल्थ यूज ऑफ टेक्नॉलॉजीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
बिछान्यात गेल्यानंतर अनेकजण कमीत कमी चार वेळा कोणाचे मेसेज आलेत ते पाहण्यासाठी मोबाईल आणि टॅबलेट चेक करतात. झोपेच्यावेळी मोबाईल बंद ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. झोप कमी झाली किंवा झोपेचा आजार झाला तर, ह्दयरोग होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. 2015 मध्ये गुरगावमधील एका खासगी रुग्णालयाने तरुण वयातच ह्दयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांचा अभ्यास केला. त्यामध्ये 90 टक्के तरुण झोपेच्या आजाराचे रुग्ण असल्याचे आढळले.