चार पोलीस कर्मचारी सेवेतून निलंबित
मुंबई येथील व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडील ४० लाख रुपये लुटण्याच्या प्रकरणातील मुख्य महिला आरोपीसह ९ जणांना मुख्यन्यायदंडाधिकारी यांनी १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर गुन्ह्य़ात सहभागी असणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ७ आरोपींची पोलीस कोठडी संपत आल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचबरोबर तर गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी मुनीरा दापोलकर आणि तिचा मुलगा साहिल दापोलकर यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गुरुवारी श्रीवर्धन येथून ताब्यात घेतले होते. या दोघांनाही शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. आर. कांबळी यांनी सर्वाना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
गुन्ह्य़ाच्या वेळी अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली आय-२० कार आणि गुन्ह्य़ातील रोकड लुटून पळून जाण्यासाठी वापरण्यात आलेली सुझुकी ब्रेझा कार पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणात लुटण्यात आलेल्या ४० लाख रुपयांपकी २ लाख रुपयांची रोख रक्कम आतापर्यंत हस्तगत करण्यात आली आहे. याशिवाय सर्व आरोपींचे मोबाईलफोन ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील व्यापारी विमल पटेल यांना मुनीरा नामक माहिला आरोपीने कमी भावात जमीन देते असे सांगून अलिबागला बोलावून घेतले. मात्र त्यानंतर त्याचे अपहरण करून त्यांच्याकडील पन्नास लाखांपकी ४० लाख रुपयांची रोख रक्कम सात ते आठ साथीदारांच्या मदतीने लुटली होती. ही घटना २६ डिसेंबर २०१६ रोजी घडली होती. अपहरण आणि दरोडय़ाच्या प्रकरणात पोलिसांचा सहभाग समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.
यानंतर या सर्वावर अपहरण आणि दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुर्वनियोजित कट केल्याप्रकरणी सर्वावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
चारही पोलीस कर्मचारी निलंबित
या प्रकरणात अलिबाग येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. फौजदारी कारवाई बरोबरच चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिले होते. या गुन्ह्य़ात सहभागी असणाऱ्या रवी अंबू राठोड, प्रशांत अशोक कांबळे, किशोर धनाजी खाडे आणि श्रीधर भोसे या चौघांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.