नोटाबंदीनंतर पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी बँकांसमोर लागलेल्या रांगांमध्ये बळी गेलेल्या १३ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते पीडितांच्या कुटुंबीयांना धनादेशांचे वाटप करण्यात आले. तसेच कानपूरमध्ये बँकेच्या रांगेत प्रसूती झालेल्या महिलेलाही दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, नोटाबंदीनंतर बँका आणि एटीएमसमोरील रांगेत अलिगढमधील रझिया, सितापूरमधील विरेंद्र कुमार, कुशीनगरमधील तिर्थराजी, लाखिमपूर खेरीमधील पयकर्मा यादव, बरेलीमधील खलील अहमद, प्रतापगडमधील करमीता, हमीरपूरमधील बबलू यादव आणि घासीता, आग्रा येथील राकेश चंद्रा, औरियामधील राधारमण, जालौनमधील गंगा चरण, महोबातील बालादिन आणि बुलंदशहरमधील मीर सिंग यांचा मृत्यू झाला होता. तसेच सर्वेशा देवी या २५ वर्षीय महिलेची बँकेच्या रांगेत प्रसूती झाली होती. राज्य सरकारने घरकूल योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी दिलेल्या पहिल्या हप्त्याची २० हजारांची रक्कम काढण्यासाठी बँकेसमोरील रांगेत उभी होती. मी बँकेच्या रांगेत उभी राहू शकत नाही, अशी विनंती मी बँक कर्मचाऱ्यांना केली होती. मात्र, तरीही तुम्ही वाट बघा, असे मला त्यांनी सांगितले होते, असे सर्वेशा देवी यांनी सांगितले.
बँकेच्या रांगेत सकाळी ९ वाजल्यापासून उभी होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बँकेच्या रांगेतच प्रसूती झाली. मी प्रसूतीवेदनांबाबत बँक व्यवस्थापनाकडे सांगूनही कोणतीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. मी मुलाला जन्म दिला, असेही सर्वेशा देवी यांनी सांगितले. बँक रांगेत मृत्यू झालेल्या बबलू यादव यांच्या पत्नीनेही मदत स्वीकारल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. माझे पती बँक रांगेत जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी उभे होते. त्यावेळी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे तिने सांगितले. दरम्यान कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कमांडो सिनोद कुमार, बीएसएफ जवान हरीकेश प्रसाद, लष्कराचे जवान मुलतान सिंह, बीएसएफचे जवान हरवेंद्र यादव यांच्या कुटुंबीयांनाही २५ लाखांची मदत दिली.