देशभर नोटकल्लोळ झाल्यानंतर यातून दिलासा देण्यासाठी सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात आली. एसटी महामंडळाला नोटकल्लोळाचा फटका बसत असतानाच दुसरीकडे टोलमाफीमुळे थोडाफार दिलासाही मिळाला आहे. आतापर्यंत एसटी महामंडळाची ६ कोटींपेक्षा जास्त बचत झाली आहे.
केंद्र सरकारने ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे देशभरात गोंधळ उडाला. सुट्या पैशांची चणचण आणि दैनंदिन खर्चांचे निर्माण झालेल्या अडचणी यामुळे एसटीच्या प्रवासी भारमानावरही मोठा परिणाम झाला. एसटी महामंडळाने १४ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीतील गर्दीचा हंगाम पकडून चांगले उत्पन्न मिळण्याचे उद्दिष्टही ठेवले होते. मात्र महामंडळाला भारमान कमी झाल्याने जवळपास २३ कोटींपेक्षा जास्त आर्थिक फटका बसला. आर्थिक फटका बसलेला असतानाच दुसरीकडे महामंडळाला टोलमधून थोडाफार दिलासा मिळाला. दरवर्षी एसटी महामंडळ १३0 कोटी रुपये टोल भरते. याप्रमाणे दररोज ३५ लाख ६0 हजार रुपये टोल एसटीकडून टोल भरला जातो.
टोलनाक्यांवरही नोटकल्लोळाचा फटका बसल्याने यातून सरकारने वाहन चालकांना दिलासा देत काही दिवसांसाठी टोलमाफी दिली. ११ नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी दिल्यानंतर ही मुदत १४ नोव्हेंबर व त्यानंतर १८ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. परंतु वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने २४ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली. त्यातही बदल करत १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महामंडळाला दिलासा मिळाला असून आतापर्यंत ६ कोटी ७६ लाखांची बचत झाल्याची माहिती देण्यात आली. आणखी काही दिवस शिल्लक असल्याने या बचतीचा आकडा वाढणार आहे.
