नोटाबंदी निर्णयानंतर आता नोटांचा प्रवास 21 वरुन फक्त 6 दिवसांवर

नोटाबंदी निर्णयानंतर देशभरात नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. एटीएम आणि बँकांबाहेर लागलेल्या लोकांच्या रांगा दिवसेंदिवस वाढत आहेत. एटीएममध्ये तर कॅश टाकली की लगेच संपत असल्याने लोकांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. यासाठी सरकारने नोटांचा तुटवडा भरुन काढण्यासाठी सर्व प्रयत्न पणाला लावले आहेत. प्रिटिंग प्रेसपासून ते बॅकांपर्यत पैसे पोहचवण्यासाठी वाहतुकीच्या सर्व साधनांचा वापर केला जात आहे. यासाठी हेलिकॉप्टर तसंच भारतीय हवाई दलाच्या जहाजांचीही मदत घेतली जात आहे.
जिथे प्रिटिंग प्रेसपासून बँकांपर्यत पैसे पोहोचण्यासाठी 21 दिवस लागायचे तो प्रवास आता फक्त 6 दिवसांमध्ये पार केला जात आहे. पुढील आठवड्यात परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा सरकारडून व्यक्त करण्यात येत आहे. शहरांमध्ये पुरवठा व्यवस्थित सुरु आहे, त्यामुळे सध्या ग्रामीण भागांकडे जास्त लक्ष दिलं जात आहे.
15 जानेवारीपर्यंत अर्थव्यवस्था पूर्ववत होण्याची आशा आहे. दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांचे आकार वेगळे असल्यामुळे एटीएममध्ये ते बसवण्यासाठी रिकॅलिब्रेशन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *