सहकार महर्षी, पद्मविभूषण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या घराघरांतील ‘दादा’ यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात रविवारी सांगली या त्यांच्या कर्मभूमीत कृतघ्नतेने सुरू झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणातील जवळपास सर्व दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर-पाटील, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते या शताब्दी कार्यक्रमाला उपस्थित होते.
वसंतदादांची समाधी असलेल्या कृष्णाकाठावरच जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार होत्या; परंतु काही व्यक्तिगत कारणामुळे त्यांना उपस्थित राहता आले नाही. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वक्त्यांनी वसंतदादांच्या कर्तृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
माजी मुख्यमंत्री श्री. नारायणराव राणे यांनी तर जबरदस्त चिमटा काढून आपल्या भाषणात सांगितले की, वसंतदादा पाटील यांनी शेती क्षेत्रात अनेक प्रयोग केले, त्यांची लोकप्रिय झालेली घोषणा म्हणजे ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ मात्र सध्याच्या भाजपा सरकारने सामान्य माणसाला ‘अडवा आणि त्याची जिरवा’ असाच कार्यक्रम अनेक प्रकारे सुरू केला आहे.
हजार-पाचशेच्या नोटा रद्द करून सामान्य माणसाला सर्वात जास्त त्रास झाला आहे. त्यांचे घर चालणे अशक्य झाले आहे, अशी टीका श्री. राणे यांनी केली. वसंतदादांच्या सहकार क्षेत्रातल्या कार्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, एक स्वतंत्रसैनिक स्वातंत्र मिळाल्यानंतर विधायक कामात स्वत:ला समर्पित करून घेतो. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र सहकारातून क्रांती घडली आहे, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, दादांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेणे सुलभ झाले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आदी थोर नेत्यांनी उभी केलेली सहकार चळवळ आताचे सरकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
वसंतदादांनी शेतक-यांसाठी संघर्ष केला. महाराष्ट्रात समतोल राखण्याचा सर्वात मोठा प्रयत्न दादांनीच केलेला आहे, असे शिवराज पाटील यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमात दादांचे सेवक आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशवंत हप्पे यांच्यासह दादांची सहकार क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वसंतदादांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
