नोटबंदीच्या निर्णयाचे मोदी समर्थकांकडून जोरदार समर्थन सुरु असले तरी या निर्णयाचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहे. नोटबंदीमुळे जम्मू काश्मीरमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यभरातील इंटरनेट सेवा बंद असल्याने क्रेडिट आणि डेबिट कार्डही निरुपयोगी ठरत असून एटीएमही बंद पडल्याने काश्मीरमधील नागरिक त्रस्त झाले आहेत.
नोटबंदीच्या निर्णयानंतर एटीएम सेवा कोलमडली असली तरी डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाईल वॉलेटमुळे देशभरातील नागरिकांना दिलासा मिळत आहे. पण काश्मीरमधील नागरिकांना या सुविधेचाही फायदा मिळत नाही. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु झाल्याने राज्यभरात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्यासाठी पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशिनचा वापर केला जातो. मात्र या मशिनसाठी मोबाईलमधील सिमकार्डमध्ये इंटरनेट सेवा सुरु असणे गरजेचे असते. पण मोबाईल इंटनेट बंद असल्याने जम्मू काश्मीरवासीयांच्या हालात भर पडली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये बहुसंख्य पीओएस मशिन या जम्मू काश्मीर बँक आणि एचडीएफसी बँकेतर्फे पुरवण्यात आल्या आहेत. या मशिन चालण्यासाठी इंटरनेट बंधनकारक असते. इंटरनेटअभावी या मशिन चालूच शकत नाही असे राज्यातील बहुसंख्य दुकानदारांचे म्हणणे आहे. ‘मला वैद्यकीय तपासणीसाठी अडीच हजार रुपयांची गरज होती. शहराच्या विविध भागातील एटीएमच्या फे-या मारल्या. शेवटी एका एटीएममधून दोन हजार रुपये मिळाले. उर्वरित पैसे एका मित्राकडून घेतल्याने तुर्तात सुटका झाली अशी प्रतिक्रिया झुबैर अहमद या तरुणाने दिली. माझ्याकडे कार्ड आहेत, पण सध्या त्याची किंमतही शून्यच आहे. आता दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न एका तरुणाने उपस्थित केला आहे.
मोबाईल इंटरनेट सेवा बंद असली तरी बीएसएनएलचे ब्रॉडबँड इंटरनेट सुरु आहे. पण राज्यात बीएसएनएलचे सहा हजार ग्राहक आहेत. काश्मीर खो-यातील फक्त १०० पेट्रोल पंप ब्रॉ़डबँड इंटरनेटने जोडले गेले आहेत. तर श्रीनगरमधील फक्त एका दुकानात ब्रॉडबँड इंटरनेट आहे. त्यामुळे बहुसंख्य नागरिकांकडील कार्ड फक्त शोभे पुरतेच उरल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
फारुख अब्दुल्लांची उधारीवर खरेदी
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला शनिवारी सकाळी लाल चौक परिसरात खरेदीसाठी गेले होते. नोटबंदीचा निर्णय आणि त्यामुळे बंद पडलेले एटीएममुळे अब्दुल्ला यांच्याकडेही पैसे नव्हते. तर क्रेडिट किंवा डेबिटकार्डही चालत नसल्याने अब्दुल्ला यांना खरेदी करणे शक्य नव्हते. पण अब्दुल्ला हे ओळखीचे असल्याने दुकानदाराने त्यांना उधारीवर खरेदी करण्याची मुभा दिली. पण अब्दुल्ला यांच्यासारखी ‘ओळख’ सर्वांकडेच नसते. त्यामुळे नेत्यांना दिलासा मिळत असला तरी सर्वसामान्य जनतेचे काय करायचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
