जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफला लॉन्च केल्यानंतर निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आता लवकरच आणखीन एका स्टार पुत्राला लॉन्च करणार आहे.
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी त्याच्या करिअर क्षेत्रातील सुरुवात साजिदच्या बॅनरमधून करणार आहे. साजिदने स्क्रिप्ट फायनल केली असून हा एक रोमॅन्टिक आणि अॅक्शनपट आहे. दरम्यान या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्रीच्या नावाबाबत अद्याप विचार झालेला नाही.
मागील वर्षी सलमानने सुनील शेट्टीची मुलगी अथिया हिला ‘हीरो’मधून प्रेक्षकांसमोर आणले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अहानचेही अनेकांना दर्शन घडले होते. या वेळी सलमान अहानलाही लॉन्च करणार असल्याची चर्चा होती.
२१ वर्षीय अहानने अमेरिकेच्या एका महाविद्यालयातून अभिनय आणि फिल्म मेकिंगचा अभ्यास केला आहे. सध्या अहान जिममध्ये घाम गाळत आहे. लवकरच त्याला त्याच्या वडिलांसारखी बॉडी बनवायची आहे.