प्रत्युषा बॅनर्जीच्या संभाषण प्रतीतून नव्या बाबी उघड

मी येथे अभिनयाच्या दुनियेत नाव कमावण्यासाठी आले होते.. काम करण्यासाठी आले होते.. पण तू मला आज कुठे आणून ठेवले आहेस.. राहुल तुला माहीत नाही या क्षणाला मला किती दु:ख होत आहे.. तू स्वार्थी आहेस.. तू माझे नाव खराब केले आहेस.. लोक माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत.. राहुल सगळे संपले आहे.. मी संपले आहे..माझा मृत्यू झाला आहे..’

‘बालिकावधू’फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने आत्महत्या करण्याच्या काही क्षण आधी प्रियकर राहुल राज सिंहसोबत भ्रमणध्वनीवरून केलेल्या संभाषणाची ही प्रत उपलब्ध झाली आहे. त्या दोघांतील हे संभाषण तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले यावर प्रकाश टाकणारे आहे. शिवाय राहुलने तिला वेश्या व्यवसायात ढकलले होते आणि म्हणूनच तिने जीवन संपवल्याचे हे सूचित करत आहे.

आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने राहुलला संपर्क साधला होता आणि त्यांच्यात तीन मिनिटे संभाषण झाले होते हे पुढे आले आहे. या संभाषणामध्ये प्रत्युषा राहुलला शिवीगाळ करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला दोष देत होती. संभाषणात तिने एका ठिकाणी ‘वेश्या व्यवसाय’ असा शब्दप्रयोग केला आहे.

राहुल  तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता, काहीही अनुचित न करण्याचे सांगत होता. ‘तू काहीही करू नको.. मी अध्र्या तासात घरी येतो आहे..’ असे राहुल तिला सांगत होता. त्यावर ‘अध्र्या तासात सगळे संपलेले असेल..’ असे शेवटचे प्रत्युत्तर प्रत्युषाने राहुलला दिले.

नव्याने पुढे आलेल्या या संभाषणाबाबत बोलताना, प्रत्युषाच्या आईवडिलांना कोण धमकावते आहे हे पोलिसांनी शोधून काढावे, त्यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करायला हवा होता. परंतु त्यांच्याकडून तो केला जात नाही. त्यामुळेच प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचे तिच्या आईवडिलांचे वकील नीरज गुप्ता यांनी सांगितले आहे.

तर या संभाषणातील जे माहीत नाही ते उघड झालेले नाही, असा दावा राहुलकडून करण्यात येत आहे. तिने केवळ पैसे कमवावा, त्यासाठी तिने काहीही करावे असे तिच्या आईवडिलांचे म्हणणे होते हे प्रत्युषा मला सांगायची. त्यांच्याविषयी ती सतत तक्रार करायची, असा दावा राहुलने केला आहे.

गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये प्रत्युषाने १ एप्रिल रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती.  त्यानंतर राहुलवर पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. मात्र उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने सध्या तो जामिनावर बाहेर आहे. राहुलच्या म्हणण्यानुसार तिचे आई-वडील आणि मित्रपरिवार आपल्याला   गोवत आहे. तिच्या पैशांसाठी आपण तिचा वापर करून घेतल्याचा  आरोप करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *