लातूर एक्स्प्रेसला ठाण्यात कायमस्वरूपी थांबा

मुंबईच्या सीएसटी स्थानकातून दररोज रात्री लातूरला जाणाऱ्या एक्स्प्रेसला एक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी कायमस्वरूपी थांबा मिळाला. या गाडीला मागील वर्षी तात्पुरत्या स्वरूपाचा थांबा देण्यात आला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांतच थांबा बंदही करण्यात आला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे असंतोष व्यक्त केला. तसेच या गाडीला कायमस्वरूपी थांबा देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. खासदार राजन विचारे यांनी या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. त्यानंतर एक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या गाडीला शनिवार रात्रीपासून कायमस्वरूपी थांबा देण्यात आला. याबरोबरच लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या हातिया एक्स्प्रेस, भुवनेश्वर एक्स्प्रेस, पुरी एक्स्प्रेस या अन्य तीन गाडय़ांनाही थांबा मिळाला आहे.

देशातील पहिल्या रेल्वे प्रवासाचे साक्षीदार असलेल्या ठाणे स्थानकात दीडशे वर्षांहून अधिक काळ उलटला तरी काही गाडय़ांना अद्याप थांबेच मिळालेले नाहीत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई किंवा कल्याण स्थानक गाठावे लागते. सहकुटुंब अवजड सामानासह हा प्रवास करणे प्रवाशांना त्रासदायक ठरून त्यांची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे या गाडय़ांना ठाणे स्थानकात थांबा देण्याच्या मागण्यांना जोर चढला. या संदर्भात प्रवासी आणि लोकप्रतिनिधींचा वारंवार पाठपुरावा सुरू होता. अखेर गेल्या वर्षी लातूर एक्स्प्रेस या गाडीला ठाणे स्थानकात तात्पुरता थांबा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *