मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकांवर सुनावणी घ्यावी व या याचिकेत बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती करणार्या कार्यकर्ते विनोद पाटील यांच्या अर्जावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
गेली 14 महिने या याचिका प्रलंबित आहेत. मुळात मराठा आरक्षणाविषयी अर्धवट माहिती न्यायालयात सादर झाली आहे. या संदर्भात इत्थंभूत माहिती सादर करण्याची संधी द्यावी. न्यायालयात प्रलंबित याचिकांवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने या समाजातील अनेक गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. तरुणांना नोकरी मिळालेली नाही, असा दावा अर्जात करण्यात आला आहे.
या अर्जावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती गुरुवारी न्या. अनुप मोहता यांच्या खंडपीठासमोर गेल्या आठवड्यात करण्यात आली होती.