नजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान महाराष्ट्राचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. चंदू बाबूलाल चव्हाण असं या जवानाचं नाव असून तो धुळ्याचा आहे.
धक्कादायक म्हणजे चंदू चव्हाण हे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असल्याचं समजताच, त्यांच्या आजीचाही मृत्यू झाला आहे. लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) असं त्यांचं नाव आहे.
चंदू चव्हाण यांच्या आई-वडिलांचं लहाणपणीच निधन झालं. त्यामुळे चंदू आणि त्यांचा भाऊ भूषण या दोघांचं पालन-पोषण त्यांच्या आजी- आजोबांनी केलं.
भूषण चव्हाण हे सुद्धा भारतीय सैन्यदलात आहेत. सध्या ते 9 मराठा रेजिमेंटमध्ये असून, गुजरातच्या जामनगरमध्ये कार्यरत आहेत. भूषण चव्हाण यांच्याकडेच आजी-आजोबा राहातात.
चंदू चव्हाण हे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात सापडल्याची बातमी समजल्यानंतर, त्यांच्या आजीचंही गुजरातमध्ये निधन झालं.
आजीचं पार्थिव गुजरातच्या जामनगरहून धुळ्यातील मूळगाव बोरविहीर इथं आणलं जाणार आहे. पार्थिव आज संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.