हागणदारीमुक्तीनंतर स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक मिळवणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ३० सप्टेंबरला होणार आहे. हा गौरव जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल हे स्वीकारणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने हागणदारीमुक्त मोहिमेत राज्यात प्रथम आणि उत्तर भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत आयोजित स्वच्छता मोहिमेत सिंधुदुर्गने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. यात ७५ जिल्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. स्वच्छतेत पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव करण्यात येणार आहे.
स्वच्छताविषयक कार्यशाळेचे आयोजन २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान दिल्लीत करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह सिंधुदुर्गचे प्रेझेंटेशन करणार आहेत. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणा-या गौरव कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल उपस्थित राहणार आहेत.
या यशामुळे जिल्ह्यातही गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेत यश मिळवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले, त्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचा-यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती प्रभूगावकर यांनी दिली.