जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थानमध्ये हायअ‍ॅलर्ट

भारतीय लष्कराने धडक कारवाई करून पाकव्याप्त काश्मीरमधील दशतवाद्यांचे सात प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केल्याने पाकने डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर, पंजाब व राजस्थान आदी राज्यांत हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

सीमेजवळील १० किलोमीटरचा परिसरही रिकामा करण्यात आला आहे. पाकिस्तानचा कोणताही हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कराला सज्ज ठेवण्यात आले आहे.

गुजरातलाही अतिदक्षतेचा इशारा

भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्येही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिली. पाकिस्तानची सागरी सीमारेषा गुजरातला लागून असल्याने दहशतवादी कारवायांची मोठी शक्यता आहे. हे लक्षात घेऊन सीमेवरील जिल्हा पोलीस, सागरी पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कच्छ, बनासकांता आणि पाटन हे तीन जिल्हे पाकची सीमा हद्द असल्याने विशेष काळजी घेण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल यांच्यासोबत आमचे पोलीस संपर्क साधून आहेत, असेही पटेल यांनी सांगितले.

पंजाबमधील सीमेचा ताबा लष्कराकडे

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील सुरक्षेचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली. पंजाबमधील सीमेवरील बीएसएफ जवानांच्या जागी लष्कराचे सैन्य तैनात करण्यात आल्याचे सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. बी.आर. मेघवाल यांनी सांगितले.

पाकिस्तानकडून पुन्हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन

श्रीनगर- पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी पुन्हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत नौगाम सेक्टर परिसरात घुसखोरी केली. यावेळी भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबारही करण्यात आला. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने दुस-यांदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने नौगाम सेक्टर परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास गोळीबार केल्याचे लष्कराने म्हटले आहे. या हल्ल्यात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

पंतप्रधानांनी घेतली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक

पाकविरोधी कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी तातडीने कॅबिनेट मंत्रिमंडळातील सुरक्षा समितीची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. उरी हल्ल्यानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परस्थितीही त्यांनी जाणून घेतली.

काँग्रेसकडून भारतीय लष्कराच्या कारवाईचे स्वागत

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे सात प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करणा-या भारतीय लष्कराच्या कारवाईचे काँग्रेसने स्वागत केले आहे. ‘भारतीय लष्कराचे विशेष अभिनंदन करताना आम्ही लष्करासोबत आहोत, असा विश्वास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी जागवला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी, ‘लष्कराच्या या शौर्याला आमचा सलाम असल्याचे म्हटले आहे.

आम्ही व देशवासीय लष्करासोबत

एआयएमआयएमचे अध्यक्ष असावुद्दीन ओवेसी यांनी भारतीय लष्कराच्या कारवाईचे स्वागत केले असून, आम्ही व संपूर्ण देशवासीय लष्करासोबत आहोत, असे म्हटले आहे.

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत होईपर्यंत पाकिस्तानी कलाकार आणि तंत्रज्ञांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय चित्रपट उद्योगाची प्रमुख संस्था इंडियन मोशन पिक्चर प्रोडय़ूसर्स असोसिएशन यांनी आशयाचा ठराव गुरुवारी संमत केला.

कारवाईत कोल्हापूर, साता-याचे जवान

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत सहभागी तुकडय़ांमध्ये मराठा बटालियन आणि शिख रेजीमेंटचे जवान होते. मराठा बटालियनमध्ये साता-याचे नऊ आणि कोल्हापूरचे सात जवान होते, असे मेसेज सोशल मिडीयावर रात्री फिरत होते.

बांग्लादेशकडून समर्थन

ढाका : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेली कारवाईचे योग्य असल्याचे सांगत बांग्लादेशने या कारवाईचे समर्थन केले आहे. भारताने केलेल्या कारवाई कायदेशीर व आंतरराष्ट्रीय दृष्टीने योग्य असल्याचे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सल्लागार इक्बाल चौधरी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान मुर्दाबाद

मुंबई : भारतीय लष्कराने पाकव्यप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईबद्दल महापालिका सभागृहात भारतीय लष्करी जवानांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जवानांनी, पाकचे श्राद्धच घातले असून अशाप्रकारे पाकिस्तानवर हल्ला केल्यामुळे शहिद झालेल्या आपल्या जवानांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना सभागृहातील सदस्यांनी व्यक्त केली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय सेना झिंदाबाद, वंदे मातरम अशाप्रकारे घोषणा देत महापालिका सभागृह दणाणून सोडले.

भारतीय लष्कर, त्यांना आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी मांडला. याला स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पाठिंबा देत सभागृहाचा अभिनंदनाचा प्रस्ताव लष्कराच्या प्रमुखांना पाठवावा अशी सूचना त्यांनी केली. सपाचे रईस शेख यांनीही भारत नेहमी प्रामाणिकपणे वागते, पण पाकने ही कमजोरी समजू नये,अशा शब्दात पाकवरील हल्ल्याचे समर्थन केले. आपल्या पातळीवरही पाकचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न व्हायला हवा,अशी सूचना मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला. आपण नगरसेवक असलो तरी आजही सैन्यात जाण्याची संधी मिळाली तरी आपण देशाचे रक्षण करण्यासाठी तिथे जावू, असे शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी सांगत आपले देशप्रेम व्यक्त केले. महापालिकेच्यावतीने देशाच्या संरक्षण विभागाला महापालिकेच्यावतीने आर्थिक मदत देण्याची मागणी मनसेच सुधीर जाधव यांनी केले. प्रत्येक नगरसेवकांचा एक महिन्यांचा पगार संरक्षण विभागातील या जवानांसाठी देण्यात यावा,अशी मागणी काँग्रेसचे नौसिर मेहता यांनी केला.

सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव, महापौर स्नेहल आंबेकर यांनीही भावना व्यक्त केल्या. लष्कराच्या जवानांच्या अभिनंदनाचा हा प्रस्ताव लष्कर प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *