मालवण जेट्टी येथे वाळूशिल्प साकारले

निर्मल सागर तट अभियानांतर्गत जनजागृती व्हावी यासाठी मालवण जेट्टी येथे साकारलेल्या वाळूशिल्पाचे उद्घाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन व्ही. एच. इंगळे तसेच वाळूशिल्प साकारणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक व त्यांचे सहकारी उपस्थित होते.  उद्या साजरा होणारा आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस तसेच निर्मल सागर तट अभियानांतर्गत मालवण येथे वाळूशिल्प साकारताना मला वेगळी अनुभूती मिळाली, असे सांगून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक म्हणाले की, मी संपूर्ण जगभर वाळूशिल्प साकारण्यासाठी फिरत असतो. महाराष्ट्रात विशेषत: सिंधुदुर्गातील सागरकिनारे पाहून मी मोहित झालो आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी मी चिवला बीचवर वाळूशिल्पे साकारली होती. सिंधुदुर्गातील निसर्गरम्य, नयनमनोहारी व स्वच्छ सागरकिनारे पाहून मी प्रभावित झालो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उपयुक्त तसेच पर्यटनवृद्धीसाठी हे निर्मल सागर तट अभियान गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले, वाळूशिल्प ही कला इच्छुकांना शिकविण्याची माझी तयारी आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेतला तर मी सहकार्य करेन. कोणार्क वाळूशिल्प महोत्सवाच्या धर्तीवर वाळूशिल्प महोत्सव सिंधुदुर्गात आयोजित केल्यास या महोत्सवासही मी सर्वतोपरी सहकार्य करेन. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी निर्मल सागर तट अभियानांतर्गत या वाळूशिल्पाची उभारणी केली असून सागरीकिनारे दैनंदिन स्वच्छ राहावे, तसेच जिल्ह्य़ात पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग वाढवावा, तसेच लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले आहे.

प्रारंभी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन व्ही. एच. इंगळे यांनी मान्यवरांचे स्वागत करून अभियानाची माहिती दिली. मालवण जेट्टी येथे आयोजित कार्यक्रमास भंडारी व टोपीवाला हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक तसेच पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *