महाराष्ट्रीय तिखट खाद्य संस्कृतीत अग्र नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिसळ या पदार्थाचे फक्त नाव जरी काढले तरी लालभडक झणझणीत रस्सा आणि चमचमीत र्ती डोळ्यासमोर येते. फरसाण, कांदा आणि पाव हे मिसळीचे घटक इथून तिथून सारखेच असले तरी जशी दर पाच मैलावर भाषा बदलते, तशीच मिसळीची चवही बदलते. आपल्याकडे संगीताची जशी निरनिराळी घराणी आहेत, तशीच मिसळीचेही अनेक प्रकार आहेत. पुणे आणि कोल्हापूर हे मिसळीचे प्रमुख खाद्यपीठे मानली जातात. मात्र याशिवाय इतर प्रांतांनीही या मिसळीत आपापली स्वभाववैशिष्टय़े मिसळली आहेत. पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर, आंबेगाव आदी भागातील मिसळचीही काहीशी अशीच ख्याती आहे. या भागातील मिसळ म्हणजे अगदी नाकाडोळ्यांतून पाणी काढते. मात्र बेमालूम चवीमुळे जिभेचा हा चटकाही खवैय्ये आनंदाने सहन करतात. या भागात फक्त मटकीची उसळ मिसळ तयार करण्यासाठी वापरली जाते. खास जुन्नरकडच्या मिसळीची ही चव आता डोंबिवलीतही मिळू लागली आहे. येथील बल्लाळेश्वर हॉटेलमध्ये मिसळीसोबत कढीवडा हा आणखी एक गावाकडचा पदार्थ मिळतो. आंबट तिखट चवीच्या ताकामध्ये बुडवलेल्या या मूळच्या बटाटेवडय़ाचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.
काही महिन्यांपूर्वी विजय गावडे यांनी डोंबिवलीतील फडके रोडवर हॉटेल बल्लाळेश्वर सुरू केले. दाक्षिणात्य, मोगलाई, पंजाबी, गुजराती आदी विविध पदार्थाना आपलेसे करणाऱ्या खवय्या डोंबिवलीकरांनी जुन्नरच्या या मिसळीवरही पसंतीची मोहोर उमटवली आहे. मुंबईकर चाकरमानी पुण्याला गेले की गावची मिसळ खाल्याशिवाय परतत नाहीत. त्यांना इतरवेळीही हवी तेव्हा गावच्या मिसळची चव चाखता यावी याच उद्देशाने गावडे यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये हॉटेल टाकण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी कल्याण व डोंबिवलीमध्ये हॉटेल सुरू केले. तसेच गावीही त्यांच्या दोन शाखा आहेत, वडिलांकडून प्रेरणा घेऊन विजय गावडे यांनी या व्यवसायात उतरण्याचे ठरविले. या महाराष्ट्रीय पदार्थाची कीर्ती त्यांना देशभर न्यायची आहे.
मटकीची उसळ तशी साधीच. त्यात काय विशेष असे समजू नका. कारण या मिसळीला अस्सल गावरान मसाल्याची चव आहे. तो रंगाने लाल नसतो. मात्र तरीही चांगलाच झणझणीत असतो. कांदा, आलं लसूण पेस्ट आणि या मसाल्याची फोडणी देऊन मटकी शिजवून घेतली जाते. त्यावर चमचमीत लालेलाल र्ती ओतली जाते. तसेच खास पुण्याकडचे फरसाणच या मिसळमध्ये टाकले जाते. त्यावर चिरलेला कांदा, कोिथबीर आणि लिंबू एक वेगळीच लज्जत आणते. मिसळीसोबत पाव खाण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे उदरभरण. बहुतेक नोकरदार दुपारच्या जेवणाची वेळ मिसळीवर भागवितात. अशा वेळी दोन-तीन पावांनी पोट भरले जाते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पावामुळे मिसळीचा तिखटपणा सुसह्य़ होतो. मिसळीचा तिखटपणा कमी करण्याचे काही अन्य उपायही आहेत. काही खवैय्ये सोबत ताक घेतात. मात्र गावाकडची मंडळी त्यासाठी चक्क सॅम्पल मागवितात. सॅम्पल हा खास गावाकडचा शब्द आहे. पुण्यातील ग्रामीण भागात तो सर्रास वापरला जातो. मिसळीचा तिखटपणा कमी करण्यासाठी सॅम्पल म्हणून दह्य़ाची छोटी डिश दिली जाते.
मिसळसोबतच येथे आंबटतिखट ताकाच्या चवीचा खास पुणेरी कढीवडाही मिळतो. कढीवडा म्हणजे आपल्या बटाटे वडय़ाचा चुलतभाऊ आहे. मात्र त्याची चव थोडी वेगळी. तसेच वडारस्सा पाव, चटकदार ओली भेळ, सुकी भेळ, विशेष अशी मटकी फ्राय केलेली मटकी भेळही येथे मिळते. हे सगळं खाल्यानंतर गवती चहा टाकलेल्या मस्त वाफळत्या चहाने या मस्त खाद्य मैफलीची छान भैरवी होते. आता गल्लीबोळात सर्वत्र चहा मिळत असला तरी असा औषधी चहा मिळणे दुर्लभ असते. सर्दी, पडसे किंवा अंग मोडून ताप आला की हा गवती चहा औषधोपचारी ठरतो. त्यामुळे अनेकजण केवळ येथे गवती चहा पिण्यासाठी येतात.
अवघ्या काही महिन्यांतच या पदार्थाची ख्याती ही ठाणे, कुल्र्यापर्यंत गेली आहे. लोक येथून पार्सल मागवितात. ग्राहक आपल्या पदार्थानी संतुष्ट आहेत की नाही हे पाहण्यासाठी येथे एक नोंदवहीही ठेवण्यात आली आहे. त्यानुसार कामाची बरी- वाईट सर्व पडताळणी केली जात असल्याचे कर्मचारी संदीप आभाळे यांनी सांगितले. अवघ्या २० ते ५० रुपयांमध्ये ग्राहकांना पोटभर नाश्ता मिळत असल्याने चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. रविवारी तर येथे ग्राहकांची झुंबड उडत असल्याचेही त्यांनी सांगितले.