‘अलिकडे नायब राज्यपाल पद वादात’

दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्या वादासंदर्भातील प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अलिकडच्या काही घटनांवरून राज्यपाल पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया संयुक्त जनता दलाने व्यक्त केल्या आहेत.

वृत्तसंस्थेशी बोलताना संयुक्‍त जनता दलाचे नेते निरज कुमार म्हणाले, “अलिकडच्या काही काळात राज्यपालाचे पद वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. जर आपण उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यातील काही घटना पाहिल्या तर केंद्र सरकार लोकांनी निवडलेल्या राज्य सरकारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. असाच प्रकार दिल्लीमध्ये आढळून आला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अधिकार बळकावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.‘ तसेच या व्यवस्थेबद्दल तातडीने पुनर्विचार करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान “आम आदमी पक्षाचे शत्रुत्वाची भावना सोडून जबाबदारीकडे लक्ष द्यावे‘ असा सल्ला केंद्र सरकारने केजरीवाल यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *