आमदारांच्या बैठकीत खडसे यांचा अपमान

भाजपचे बडतर्फ मंत्री एकनाथ खडसे यांचा पक्षांतर्गत पाणउतारा थांबण्याचे संकेत नाहीत. गुरुवारी आमदारांच्या बैठकीत बोलू न दिल्याने नाथाभाऊंचा पारा चढला अन्‌ ताडकन व्यासपीठावरून उठून ते निघून गेले. भाजप आमदारांच्या समक्ष हे नाट्य घडल्याने सर्वच नेत्यांनी या घटनेबाबत हाताची घडी तोंडावर बोट ठेवले आहे.
मुंबईत महिला आर्थिक मंडळाच्या सभागृहात भाजप आमदारांची बैठक बोलावली होती. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष दानवे, महाराष्ट्र प्रभारी व्ही. सतीश व एकनाथ खडसे उपस्थित होते. या अगोदरच्या सर्व बैठकांमध्ये सुरवातीला व्ही. सतीश आमदारांना मार्गदर्शन करत असत. त्यानंतर एकनाथ खडसे व शेवटी प्रदेशाध्यक्षांचे भाषण असा क्रम असे. या बैठकीत मात्र व्ही. सतीश यांच्यानंतर थेट दानवे यांनी भाषण सुरू केले. यामुळे संतापलेल्या नाथाभाऊंनी व्यासपीठ सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. 
 
दानवे यांचे भाषण सुरू असताना ते उठले. खिशात हात घालून सवयीप्रमाणे पॅंट वर सारत नाथाभाऊ एकाही आमदाराकडे व नेत्याकडे न पाहता बैठकीतून बाहेर पडले. ते बाहेर पडत असताना सर्व भाजप आमदार अचंबित नजरेने पाहत होते. कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. मंत्रालयाशेजारील या बैठकीत अपमान झाल्याचे शल्य घेऊन त्यांनी पक्षाच्या नेत्यांना एकप्रकारे आव्हानच दिल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *