जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार

गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्गात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे.  रविवारी पहाटेपासून दिवसभर जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार पाऊस बरसला. कुडाळ तालुक्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक भाग जलमय झाला होता. कुडाळ-वालावल मार्गावर नेरूर येथे तर वेंगुर्ले-मठ मार्गावर बोवलेकरवाडी येथे वादळी पावसाने झाडे पडून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार आहे.
जिल्ह्यात जूनच्या तिसर्‍या आठवड्यापासून धुवाँधार पावसास सुरुवात झाली ती 12, 13 जुलैपर्यंत कायम होती. परिणामी, जिल्ह्यातील अनेक तलाव, धरणे  तुडुंब भरले. आतापर्यंत पावसाने 1800 मि.मी.हून अधिक सरासरी गाठली आहे. या दमदार पावसामुळे भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. रविवारी कणकवली तालुक्यातही संततधार पाऊस झाला. या धुवाँधार पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती.
कुडाळात धुवाँधारःवालावल मार्गावर वटवृक्ष कोसळला कुडाळ शहर वार्ताहर कळवितो की, कुडाळ तालुक्याला पावसाने रविवारी झोडपून काढले. कुडाळ शहरातील  रस्ते जलमय झाले तर कुडाळ – वालावल  मार्गावर नेरूर चौपाटी येथे वटवृक्ष कोसळून  या मार्गावरील वालावल, चेंदवण, कवठी भागात  जाणार्‍या गाड्या सकाळच्या सत्रात  नेरूर चौपाटीपर्यंतच सोडण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय  झाली.  रविवारी दुपारनंतर  वटवृक्ष  हटविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत  झाली.
गेले चार-पाच दिवस ओसरलेल्या पावसाने  रविवारी पहाटेपासून पुन्हा जोर धरला. यामुळे पावसाने  कुडाळ शहरातील  रस्ते जमलय झाले. रस्ता दुतर्फा गटारे पूर्णपणे बुझून पाण्याचे मार्ग बंद झाल्याने  गीता हॉटेल   समोरील रस्त्यावर सकाळी पाणीच पाणी झाले होते. या  पाण्यातून वाहनधारक  व पादचारी  नागरिक, शाळकरी मुलांना  पाण्यातून मार्ग काढावा लागला. पोस्ट ऑफिस जवळही  रस्त्यावरून गटाराचे पाणी वाहत होते. उद्यमनगर परिसरातही   हिच स्थिती  निर्माण झाली. पावसाळ्यात वारंवार ही समस्या  उद्भवत असून याकडे संबंधित  प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
कुडाळ-वालावल मार्गावर  नेरूर चौपाटी श्री विठ्ठल  मंदिर जवळ व रस्त्यालगतचा  वटवृक्ष  सकाळी 8.45 वा.च्या सुमारास उन्मळून रस्त्यावर कोसळला. यामुळे  कवठी, चेंदवण, वालावल भागात जाणारी व कुडाळकडे येणारी वाहतुक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुक बंद झाल्यामुळे  कुडाळ आगारातून कवठी, चेंदवण, वालावलमध्ये  जणार्‍या गाड्या नेरूर चौपाटीपर्यंत नेवून मागे वळविण्यात आल्या. यात नागरिकांचे मोठे हाल झाले. इतर वाहने  अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. सा.बां.  विभागाच्या अधिकार्‍यांनी  धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दुपारी 1 वा. च्या सुमारास  रस्त्यावरील  वटवृक्ष बाजूला  हटविला त्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.
मठ मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प वेंगुर्ले वार्ताहर कळवितो की, वेंगुर्ले-मठ मार्गावर बोवलेकरवाडी येथे रविवारी आकेशियाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच वीज खांबाच्या तारा तुटून नुकसान झाले. तर दिवसभर पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
वेंगुर्ले-मठ मार्गावर बोवलेकरवाडी येथे रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास रस्त्यालगत असलेले आकेशियाचे मोठे झाड वीजेच्या तारांवर पडून रस्त्यावर कोसळले. त्यामुळे सुमारे एक तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आकशियाचे झाड वीजेच्या तारांवर कोसळल्याने तारा तुटून तसेच काही विद्युत पोलही वाकल्याने वीज मंडळाचे नुकसान झाले. कुडाळहून वेंगुर्लेकडे येणार्‍या बस वेतोरे येथून खानोली-दाभोली मार्गे वेंगुर्ले येथे वळविण्यात आल्या. झाड पडल्याचे वृत्त समजताच वायरमन दिलीप कावले, बांधकाम स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक यशवंत कांडरकर यांच्यासह बांधकाम कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. सरपंच नित्यानंद शेणई, सत्यवान बोवलेकर, मनोहर बोवलेकर, भाऊ बोवलेकर, ज्ञानेश्‍वर बोवलेकर, रघुवीर बोवलेकर, महेश सावंत, मनिष बोवलेकर, भुषण बोवलेकर, उत्तम बोवलेकर, वासुदेव बोवलेकर या ग्रामस्थांनी त्वरीत झाड बाजूला करून मार्ग वाहतुकीस मोकळा केला. कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी जाणार्‍या बसेस वेंगुर्ले-मठ मार्गावरून जातात. रविवारी असल्याने आठवडा बाजाराला येणार्‍या नागरिकांची गैरसोय झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *