मुंबईत पाऊस पडून दहा दिवस ही झाले नाही तर मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. पहिल्याच पावसात मुंबईतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे निर्माण झाले असून खड्डय़ात रस्ते की रस्त्यात खड्डे, असा प्रश्न मुंबईकरांना दरवर्षीच पडतो. मुंबई महापालिकेचा रस्त्यातील भ्रष्टाचार समोर आला असून खड्डय़ांचे वास्तव मुंबईकरांसमोर आणण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे ऑनलाईन फोटो चळवळ ‘बोल मेरे पॉटहोल बोल’ मोहीम राबवण्यात येत आहे. जिथे जिथे खड्डे दिसतील तेथील फोटो काढून आम्हाला व्हॉट्सअॅप, ई-मेल किंवा ट्विटर करावेत. प्रत्येक नागरिकाने आपापल्या विभागातील खड्ड्य़ांचे फोटो आम्हाला ताबडतोब पाठवावेत, असे आवाहन मुंबई काँग्रेसतर्फे करण्यात आल्याचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.
रस्त्यांची दाणादाण उडालेली असून त्यामुळे संपूर्ण मुंबईभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसात सर्व मुंबईकरांचे असेच हाल होतात. यासाठी शिवसेना-भाजपा सरकार काहीही करत नसून रस्त्यांची चाळण होण्यास महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाच जबाबदार आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना- भाजपाची सत्ता असून मुंबई महानगरपालिकेचे रस्त्यांचे बजेट दरवर्षी ३५०० हजार कोटींचे असते. तर रस्ते दुरुस्तीचे बजेट २५०० हजार कोटी रुपयांचे असते. शिवसेना आणि भाजपा फक्त यामध्ये भ्रष्टाचार करण्यात गुंतलेले आहेत. पैसा खाण्यात ते मग्न आहेत. म्हणून मुंबई काँग्रेसने पुढाकार घेऊन खड्डय़ांसंदर्भात ऑनलाईन फोटो चळवळ ‘बोल मेरे पॉटहोल बोल’ सुरू केली आहे.
या विषयी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, मुंबईतील सर्व नागरिकांनी आता एकत्र येऊन एक उठाव, एक चळवळ उभी करण्याची वेळ आलेली आहे, असे केल्याशिवाय शिवसेना-भाजपा सरकार जागे होणार नाही. मुंबईत जागोजागी खड्डे निर्माण झालेले आहेत. रस्त्यांच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. हा एक खूप मोठा रस्ते घोटाळा आहे. हे सरकार आता तोंड लपवत फिरत आहे. सरकार म्हणते की, मुंबईत फक्त ६८ खड्डे आहेत. खोटी संख्या सांगत मुंबईकरांची दिशाभूल केली जात आहे. आता तर पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचे तीन महिने शिल्लक असून पुढील तीन महिन्यात रस्त्यांची आणि मुंबईकरांची अवस्था काय होईल, हा गंभीर प्रश्न आहे. खोटी आकडेवारी देत शिवसेना-भाजपा मूग गिळून गप्प आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा भ्रष्टाचार समोर आणला जाईल, असेही निरुपम म्हणाले.
मुंबईकरांना कुठेही खड्डे दिसल्यास मुंबई काँग्रेसने जाहीर केलेल्या
व्हॉट्सअॅप नंबरवर – ९६१९४६८९६२
फेसबुक – @Rmumcongress
ट्विटर- @mumcongress
ई-मेल- mumbaicongress@gmail.com
यावर खड्डय़ांचे फोटो पाठवावेत.