इसिसकडून ‘सेक्‍स स्लेव्हज’ची ऑनलाईन विक्री

“एका मुलीची विक्री करावयाची आहे… कुमारिका, सुंदर.. वयवर्षे 12.. तिची किंमत आता साडेबारा हजार डॉलर्स इतकी झाली आहे आणि तिची विक्री लवकरच होईल..‘ अशी घृणास्पद जाहिरात सध्या व्हॉट्‌स अप आणि इतर माध्यमांमधून होणाऱ्या शस्त्रे व इतर उत्पादनांच्या जाहिरातींच्या जोडीने प्रसिद्ध केली जात आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून सध्या पश्‍चिम आशियामधील याझिदी समुदायाच्या महिला व लहान मुलांची अशा प्रकारे “सेक्‍स स्लेव्हज‘ म्हणून विक्री केली जात आहे.

इसिसला सध्या पराभवांचा सामना करावा लागत असला; तरी या संघटनेच्या ताब्यात अद्यापी 3 हजार महिला व लहान मुली असून त्यांची अशा प्रकारे विक्री केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. प्राचीन अमानुष प्रथा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ साधत इसिसकडून आता थेट स्मार्टफोन्सच्या माध्यमामधून या “सेक्‍स स्लेव्हज‘च्या विक्रीसंदर्भातील जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. यामध्ये त्यांची छायाचित्रे आणि त्यांच्या “मालकां‘ची माहिती दिली जात आहे.

उत्तर इराकमध्ये इसिसने ऑगस्ट 2014 मध्ये चढविलेल्या हल्ल्यांत हजारो याझिदी महिला व लहान मुलांना कैद करण्यात आले होते. यानंतर अरब व कुर्दिश तस्करांच्या माध्यमामधून या कैद्यांना इसिसच्या कचाट्यामधून मुक्त करण्यात होते. मात्र आता इसिसने या तस्करांनाही ठार मारावयास सुरुवात केली आहे. यामुळे इसिसच्या ताब्यातील महिलांची मुक्तता हे एक अत्यंत कठीण आव्हान बनले आहे. इराकमध्ये युद्धापूर्वी याझिदींची लोकसंख्या सुमारे 5 लाख इतकी होती; मात्र आता या समुदायाचा नेमका आकडा अज्ञात आहे.

इसिसच्या कचाट्यातून सुटलेल्या नदिया मौराद या तरुणीने अमेरिकन कॉंग्रेस व युरोपिअन संसदेसमोर बोलताना इसिसला या कृत्याचा मोठा अभिमान वाटत असल्याचे स्पष्ट केले. याझिदींची अशा प्रकारे परवड होत असताना मानवता कुठे आहे, असा प्रश्‍न तिने विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *