राष्ट्रवादीकडून वराह वेठीला

आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय टीका करण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले. डोंबिवलीमधील भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा निषेध करण्यासाठी आयोजित आंदोलनामध्ये या कार्यकर्त्यांनी चक्क डुकराच्या लहान पिलाला साखळदंडाने बांधून आणले. त्यानंतर त्याच्या अंगावर चव्हाण यांचे छायाचित्र असलेले पोस्टर चिकटवून पाळण्यात बसविण्यात आले. हा सगळा प्रकार पोलिसांच्या समक्ष सुरू होता. या घटनेचे तीव्र पडसाद आता शहरातील प्राणीप्रेमींमध्ये उमटू लागले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आयोजित स्मार्ट सिटी शिखर परिषदेच्या कार्यक्रमात डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दलित आणि शेतकऱ्यांविषयी अपमानजनक उद्गार काढल्याचा आरोप केला जात आहे. या कथित विधानाच्या विरोधात सोमवारी ठाण्यात राष्ट्रवादीच्या विद्यार्थी काँग्रेसने आंदोलन आयोजित केले होते. मात्र, त्यात कार्यकर्त्यांच्या अमानुषपणाचे दर्शन अधिक प्रखरपणे घडले. कार्यकर्त्यांनी एका डुकराच्या पिल्लाला पकडून आणले व त्याच्या गळय़ात साखळदंड बांधण्यात आले. तसेच त्याच्या संपूर्ण अंगावर रवींद्र चव्हाण यांच्या छायाचित्राचे पोस्टर गुंडाळण्यात आले. कार्यकर्त्यांच्या या कृत्याने गांगरून गेलेले डुकराचे पिल्लू अक्षरश: अर्धमेले झाले होते. त्यामुळे हा प्रकार पाहणाऱ्या अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *