पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबईच्या दिशेने येणा-या बांद्रा रेल्वे स्थानकात थांबल्या आहेत. बांद्रा येथे लोकल गाडयांची गर्दी झाली आहे.
दादर येथे ओव्हहेड वायरमधील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. लवकरात लवकर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चर्चगेट रेल्वे स्थानकातून एकही लोकल सोडण्यात आलेली नाही. १५ मिनिटात बिघाड दुरुस्त करु असा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे.
ऐन गर्दीच्यावेळी हा बिघाड उदभवल्याने कामावर जाणा-या लाखो नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक रेल्वे प्रवासी स्वत:च गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन चालत आहेत. मुंबईत आजही पावसाळी वातावरण आहे.
पावसाने जोर पकडला तर, प्रवाशांना लोकलमध्येच अडकून रहावे लागेल. आज सकाळी मध्य रेल्वे मार्गावर लोकल दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत होत्या.