अरुंधती भट्टाचार्य आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर?

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ मिळेल की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रघुराम राजन आणि अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यातच संपुष्टात येणार आहे. रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ मिळेल, अशी अपेक्षा काही जण व्यक्त करत असतानाच अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम्, सेबीचे प्रमुख यु. के. सिन्हा हेदेखील या शर्यतीत असल्याचे समजते.
भट्टाचार्य यांनी एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. फोर्ब्जने जाहीर केलेल्या आर्थिक क्षेत्रातील पाच शक्तिशाली महिलांच्या यादीत भट्टाचार्य यांना पाचवे स्थान देण्यात आले होते. शिवाय फोर्ब्जच्या सर्वांत शक्तिशाली १०० महिलांच्या यादीत अरुंधती भट्टाचार्य २५ व्या स्थानी आहेत.
देशातील सुमारे २०० वर्षे जुन्या बँकिंग व्यवस्थेला तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग यंत्रणा बनविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात एसबीआयच्या नेटवर्कचा विस्तार होऊन बँकेच्या १७ हजार शाखा झाल्या. शिवाय एसबीआयची ३६ देशांमध्ये उपस्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *