कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात खेळत असलेल्या पाच मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला. या मुलांना उपचारांसाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले आहे.
धनलक्ष्मी सोनावणे (८), वेदांत शिंदे (६), भविष्य दिवेकर (६), काजल पवार (१०) आणि समृद्धी माघडे (१०) अशी या मुलांची नावे आहेत. या सर्वाच्या हातावर आणि पायावर कुत्र्याने चावे घेतले आहेत.
अनेक दिवसांपासून कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हा हैदोस सुरू असून त्याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री येणारे नागरिक, लहान मुले, वृद्धांना या कुत्र्यांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे. या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.