बांगलादेशात हिंदू नागरिकाची धारदार शस्त्राने हत्या

बांगलादेशातील अल्पसंख्याक आणि पुरोगामी कार्यकर्त्यांच्या हत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून हिंदू पुजाऱयानंतर आज (शुक्रवार) सकाळी हिंदू नागरिकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

वरिष्ठ पोलिस अधिकारी सेलिम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नित्यरंजन पांडे (वय 60) हे आज सकाळी चालत निघाले होते. यावेळी काही व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला. पांडे हे गेल्या 40 वर्षांपासून ठाकूर अनुकूल चंद्र सत्संग परमतिर्थ हेमायेतपुरधम अश्रमात स्वयंसेवक म्हणून काम करत होते. आश्रमाजवळच त्यांची हत्या करण्यात आली. अद्याप कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, झिनैगाह जिल्ह्यातील नोलडांगा गावात मंगळवारी (ता. 7) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी आनंद गोपाल गांगुली (वय 70) या हिंदू पुजाऱ्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली होती. हिंदू पुजाऱ्याची हत्या होण्याची बांगलादेशातील चालू वर्षातील ही दुसरी घटना होती. गांगुली यांच्या हत्येची जबाबदारी “इसिस‘ने घेतली आहे.

गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात अल्पसंख्याक, पुरोगामी विचारवंत, कार्यकर्ते आणि ब्लॉगर्स यांच्या हत्येचे सत्र सुरू आहे. इस्लामी मूलतत्ववादी संघटनांकडून या हत्या घडवून आणल्या जात असल्याचे सांगण्यात येते. रविवारी (ता. 5) एका ख्रिश्‍चन उद्योगपतीची चर्चजवळ हत्या झाली होती; तर त्याचदिवशी दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *