लष्करात लेफ्टनंट पदावरून ओंकार करणार देशसेवा

खडकवासला येथे नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी (एनडीए)च्या दीक्षान्त समारोहात आर स्कॉन या तुकडीच्या संचलनाचे नेतृत्व करण्याचा मान नाशिकच्या ओंकार प्रमोद रुईकर याने मिळविला. लहानपणापासून लष्करात करिअर करण्याचे ध्येय मनात बाळगून ओंकारने सर्व्हिस प्रिपेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय), औरंगाबाद या संस्थेतून प्रशिक्षण घेत पहिल्या प्रयत्नात “एनडीए‘त प्रवेश मिळविला. तेथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता डेहराडून येथे प्रशिक्षण घेत सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून तो देशसेवाही करणार आहे.
ओंकारचे वडील प्रमोद रुईकर युनियन बॅंकेत नोकरी करतात; तर आई माधवी रुईकर या गृहिणी आहेत. बहीण तेजश्री हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून सध्या ती पुण्यात नोकरी करीत आहे. अगदी लहानपणापासून खेळात आवड असलेल्या ओंकारचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पेठे हायस्कूलमध्ये झाले. दहावीत तब्बल 95 टक्‍के गुण मिळविल्यानंतर विज्ञान शाखा किंवा अन्य कुठल्याही अभ्यासक्रमाची निवड न करता “एनडीए‘मध्येच करिअर करण्याचा दृढ निश्‍चय पूर्वीपासूनच होता. एसपीआय, औरंगाबाद या संस्थेत इयत्ता दहावीनंतर प्रवेश मिळविला. या संस्थेत प्रवेश मिळविणे तसे कठीणच. परंतु, अभ्यासातील सातत्याच्या जोरावर त्याला प्रवेश मिळू शकला. इयत्ता बारावी 83 टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण झाल्यानंतर ओंकारने सर्व्हिस सिलेक्‍शन बोर्डाची परीक्षा दिली. या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळवत त्याने “एनडीए‘मध्ये प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करून दाखविले. येत्या 10 जुलैला एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी ओंकार डेहराडून येथे जाणार असून, त्यानंतर सैन्यदलात लेफ्टनंटपदाची धुरा सांभाळणार आहे. ओंकारने ज्यूदो या खेळात राज्यस्तरावर सहभाग नोंदविला आहे. याशिवाय बास्केटबॉल, बॉक्‍सिंग आदी खेळांचीही त्याला आवड आहे.
लष्करात अधिकारी व्हायचे स्वप्न ओंकारने लहानपणापासूनच पाहिले होते. त्यादृष्टीने त्याने वाटचाल सुरू ठेवली. त्याचे ध्येय निश्‍चित असल्याने सर्व कुटुंबीयांनी त्याला पाठबळ दिले. त्याने स्वप्न पूर्ण करून दाखविल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
– प्रमोद रुईकर, ओंकारचे वडील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *