फतेहाबाद जिल्ह्यातील भूना येथे एका खासगी बसमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजता स्फोट झाला. या स्फोटात १५ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
हरियाणामध्ये एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये तीन स्फोट झाले आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजता फतेहाबाद जिल्ह्यातील भूना येथे एका खासगी बसमध्ये स्फोट झाला. त्यानंतर बसमध्ये आग लागली. जखमींना भूना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
फतेहाबादचे पोलिस अधीक्षक ओ.पी. नरवाल यांच्यासह फॉरेंसिक टीम घटनास्थळी पोहोचली व पोलिसांनी कसून तपासणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जाखल ते फतेहाबाद मार्गावर धावणा-या खासगी बसमध्ये हा स्फोट झाला. भूना येथून सकाळी ११ वाजता बस निघाली तेव्हा चालत्या बसमध्ये एक युवक चढला होता.
बस फक्त अर्धा किलोमीटर चालली असेल तेव्हा त्यात स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागली. तेव्हा बसमध्ये एकच गदारोळ झाला.
दरम्यान, स्फोटानंतर चालत्या बसमध्ये चढलेला युवक फरार झाला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.