पोगरवाडी (ता. सातारा) येथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांची वीर पत्नी स्वाती महाडिक या इंडियन आर्मीत रूजू झाल्या आहेत. पतीच्या वीरमरणानंतर देशसेवा करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यानुसार त्या 21 पॅरा स्पेशल फोर्समध्ये दाखल झाल्या आहेत.
स्वाती यांना आर्मीचा ड्रेस केवळ सहानुभूतीतून नव्हे, तर एका सामान्य सैनिकाला जे जे करावं लागतं, ते सर्व खडतर परिश्रमातून मिळणार आहे. त्यांना केवळ वयाच्या अटीतून सूट मिळाली आहे. स्वाती या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची (एसएसबी) परीक्षा पास झाल्या आहेत. त्यानंतर त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईत दाखल झाल्या असून, ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी चेन्नई येथे त्यांचे प्रशिक्षण होईल.
जम्मू- काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचे रक्षण करताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले होते. 17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचा हा जवान शहीद झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलेही सैन्यातच जातील, असा निर्धार केला होता. सध्या त्यांच्या मुलांचे शिक्षण सुरू असून, एक मुलगा पाचगणीत, तर मुलगी डेहेराडूनमध्ये शिक्षण घेत आहे. ट्रेनिंग सेंटरमध्ये स्वाती यांच्यासोबतचे सर्व प्रशिक्षणार्थी उमेदवार हे किमान दहा वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे स्वाती यांना त्यांच्याप्रमाणे प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. तशापद्धतीने त्यांना शरीररचना, व्यायाम, प्रशिक्षणासाठी तयारी करावी लागणार आहे. स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना लष्करी सेवेत दाखल होण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी वयाची अट शिथिल केली. वीरपत्नी स्वाती यांच्यापूर्वी अनेक वीरपत्नी भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. 2012 मध्ये अरुणाचल प्रदेशात शहीद झालेले नाईक अमित शर्मा यांची पत्नीही 2014 मध्ये सैन्यात दाखल झाली आहे.
