तालुक्यात “पॉली हाउस‘ मध्ये शेती केली जात असून येथील गुलाबाची फुलं मध्य प्रदेशच्या इंदूरपर्यंत पोहोचली आहेत. छोट्या भाजी-विक्रेत्याने धाडस करून मोठ्या व्यवसायात घेतलेली उडी यशस्वी ठरली आहे. गुलाबासह लावलेली सिमला मिरची देखील गोड झाली आहे.
प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल जरी आकर्षक असले, तरीही या फुलापर्यंत पोहोचण्यासाठी काट्यांचा सामना करावा लागतो. मिरची जरी तिखट असली, तरीही तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मिरचीची मोठी बहीण मानली जाणाऱ्या “सिमला मिरची‘ चा वापर आता बऱ्यापैकी वाढला आहे. खडका (ता. भुसावळ) येथील प्रकाश पाटील यांनी खडका शिवारात, शासनाच्या मदतीने दोन एकर जागेत “पॉली हाउस‘ उभारले आहे. पॉली हाउस दोन जागांवर उभारले असून एक एकर जागेत “टच गुलाब‘ या प्रकारची 38 हजार गुलाबाची झाडे लावण्यात आली आहेत.
“लग्नसराई ते व्हॅलेन्टाइन डे‘
येथे गुलाब लावून दोन वर्षे झाली असून लग्नसराईमध्ये फुलांना भुसावळ, जळगाव, नागपूरसह मध्य प्रदेशात इंदूर येथेही मागणी आहे. नुकतीच लग्नसराई संपल्यामुळे फुलं बरीच कमी आहेत. फुलं काढल्यानंतर त्या जागेवर व्यवस्थित छाटणी करावी लागते अन्यथा फुलं पुन्हा लागत नाहीत. गुलाबाची रोपे पुणे आणि परिसरातून आणली असून चारी तयार करून रोप लावावे लागते तरच चांगल्या प्रकारे झाड उगवते व दोन महिन्यांनी फुलं लागण्यास सुरवात होते. तसा हंगाम नुकताच संपला असून येत्या “व्हॅलेन्टाइन डे‘ पर्यंत पुन्हा नवीन बहर येईल. कीड लागू नये म्हणून गुलाबास गोमुत्र, शेणखत आणि बेसन, गूळ एकत्र करून झाडाच्या तळाशी 1 कप मिश्रण घातले जाते.
सिमला मिरची
रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या साध्या मिरचीसह आजकाल “सिमला मिरची‘ देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. चोखंदळ ग्राहक आणि खवैये यांची संख्या परिसरातही कमी नाही. रेसिपी च्या घटकात सिमला मिरची जोडली गेली आहे. सहज किंवा सेलिब्रेशनसाठी बाहेर जेवायला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. फक्त घरातच नव्हे तर अशा ठिकाणी देखील सिमला मिरचीचे पदार्थ तयार केले जातात. हिरवी आणि लाल या दोन प्रकारची मिरची लागवड केली असून पुणे येथून “प्लाझा‘ बी आणून एकूण 15 हजार झाडे उगवली आहेत. झाडाचे आयुष्य 9 महिने असते, तर झाड उगवल्यापासून 2 महिन्यात झाडाला मिरची धरते. एका झाडावर सुमारे 5 किलो मिरची येते. पहिल्या मिरच्या सुमारे 400 ग्रॅम वजनाच्या होत्या, नंतर शंभर ग्रॅम वजनाची मिरची लागते. झाडा उभे राहण्यासाठी दोरीचा आधार द्यावा लागतो. या मिरचीस दादर (मुंबई), दिल्ली येथेही मागणी आहे.
