इजिप्त एअरचे विमान कोसळले

पॅरिसहून कैरोला जाणारे इजिप्त एअरचे विमान भूमध्य समुद्रात कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ६६ जण ठार झाले. मृतांमध्ये २६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, या अपघाताचे कारण लगेच सांगता येणार नाही, अशी माहिती इजिप्तचे पंतप्रधान शेरीफ इस्माईल यांनी दिली.

पॅरिसहून कैरोला निघालेले इजिप्त एअरचे विमान (ए ३२०) ३७ हजार फुटावर असताना बुधवारी रात्रौ २.४५ वाजता त्याचा रडारशी असलेला संपर्क तुटला. त्यावेळी हे विमान इजिप्तच्या हवाई हद्दीत होते.

इजिप्त एअरच्या अधिका-यांनी सांगितले की, विमान रडारवरून दिसेनासे झाल्यानंतर विमानातून आणिबाणीच्या काळातील संदेश मिळाला. मात्र, आणिबाणीच्या काळातील संदेश मिळालाच नाही, असे इजिप्तच्या लष्कराने सांगितले.

इजिप्तच्या लष्कराने बचाव व सुटकेचे काम सुरू केले आहे. मृत ६६ जणांमध्ये ५६ जण प्रवासी तर १० जण विमान कर्मचारी होते. या विमानात ३० इजिप्तिशन, १५ फ्रेंच तर ब्रिटन, बेल्जियम, कुवैत, सौदी अरेबिया, सुदान, चाड, पोर्तुगाल, अल्जेरिया व कॅनडाचा प्रत्येकी एक नागरिक होता. या मदत कार्यात ग्रीसही उतरला आहे.

ग्रीसने आपली विमाने व नौदलाची जहाजे देऊ केली आहेत. त्याचबरोबर फ्रान्सने लष्करी विमाने व जहाजे पाठवण्याची घोषणा केली. या अपघातानंतर फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सिस होलांद यांनी तातडीची बैठक बोलवली. त्यानंतर त्यांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्याशी चर्चा केली. या दुर्घटनेचे कारण शोधण्यात मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *