केवळ दहा ते वीस टक्के काळा पैसा परदेशात असून, उर्वरित 80 टक्के काळा पैसा देशातच आहे, असा दावा योगगुरु रामदेव बाबांनी केला आहे. शिवाय, हा पैसा देशात परत आणू शकलेल्या अकार्यक्षम सरकारमुळे लोकांमध्ये निराशा निर्माण होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
रामदेव बाबा म्हणाले, ‘‘आजकाल मी जिथे जातो तिथे लोक मला विचारतात, की बाबा काळा पैसा कुठे आहे? हो मी मान्य करतो. अजून काळा पैसा परत आला नाही. त्यामुळेच तो परत आणण्यासाठी मी एक नवे धोरण तयार केले आहे. मला वाटते काळा पैसा आणि इतर काही मुद्द्यांमुळे लोकांची निराशा झाली आहे.‘‘
खाणकाम, सोने, जमीन, राजकारण आणि अंमली पदार्थ क्षेत्रात सर्वात जास्त काळा पैसा आहे. जर आपण या पाच क्षेत्रातील काळ्या पैशाला लगाम घातला, तर आपल्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरेल. बँकिंग क्षेत्रावरदेखील लक्ष ठेवण्याची गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कोणतेही वैयक्तिक मतभेद नसल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, गेल्या पंधरा वर्षात एकदाही माझा पंतप्रधानांशी वाद झालेला नाही. मी दोन तीन महिन्यांतून एकदा त्यांच्याशी बोलतो. मला जर देशासंबंधी एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सल्ला द्यायचा असेल तर मी जेटलींशीसुद्धा बोलतो. मी काळ्या पैशाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी बोललो आहे.