उन्हाचा कडाका.. मान्सूनही उशिरा

यंदा अगदी वेळेवर पाऊस येणार असे भारतीय हवामान खाते छातीठोकपणे सांगत होते. पण, त्यांच्या या अंदाजात बदल झाला आहे. यंदा केरळला पावसाचे आगमन सहा दिवस उशिरा होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने नवीन अंदाजात दिली. त्यामुळे देशातही पाऊस उशिरा सुरू होईल.

केरळात दरवर्षी पाऊस १ जून रोजी दाखल होतो. यंदा त्याला पाच ते सहा दिवस उशीर होणार आहे. यंदा केरळमध्ये पाऊस ७ तारखेला दाखल होईल. मात्र त्यात काही दिवस मागे-पुढे होऊ शकतात, असे हवामान खात्याने सांगितले.

२००५ ते २०१५ या ११ वर्षात केवळ २०१५ चा अपवाद वगळता हवामान खात्याचे पावसाच्या आगमनाबाबतचे भाकीत खरे ठरले आहे. हवामानाच्या आगमनात केवळ तीन ते चार दिवसांचा फरक पडला आहे.

भारतीय हवामान खात्याचे महासंचालक लक्ष्मणसिंग राठोड म्हणाले की, येत्या काही दिवसांत दक्षिण भारतात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ निर्माण झाले आहे. ते रविवारी रात्री तामिळनाडूला धडक देण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण कर्नाटक व केरळच्या काही भागात चांगला पाऊस होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, स्कायमेट या खासगी हवामान कंपनीने मान्सूनचे आगमन २८ ते ३० मे दरम्यान होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. असह्य उष्मा आणि दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला ‘मान्सून लवकर’ या बातमीमुळे थोडा दिलासा मिळाला होता.

मात्र आता केरळमध्येच मान्सून उशिरा दाखल होणआर असल्याने महाराष्ट्रातही त्याचे आगमन लांबू शकते. सध्या देशातील अनेक भाग दुष्काळाच्या छायेत आहेत. पाण्यासाठी जनतेची पायपीट सुरू आहे. मान्सूनने अधिक वाट पहायला लावू नये अशीच जनतेची भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *