बाबा हरदेव सिंग यांचे अपघाती निधन

कॅनडातील मॉँट्रियाल शहरात झालेल्या रस्ता अपघातात निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेव सिंग यांचे निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने त्यांचे लाखो अनुयायी शोक व्यक्त करत आहेत.

संत निरंकारी मंडळाने दिलेल्या पत्रकानुसार, शनिवारी सकाळी पाच वाजता (भारतीय प्रमाणवेळ) गंभीर अपघातात बाबा हरदेव सिंग यांचे निधन झाले. हरदेव सिंग हे प्रवचनासाठी कॅनडात गेले होते.

निरंकारी मिशनचे प्रसिद्धीमाध्यम प्रमुख गुलशन राय ठकुराल म्हणाले की, बाबा हरदेव सिंग हे आपल्या दोन जावयांसोबत न्यूयॉर्कहून कॅनाडातील मॉँट्रियाल शहरात चालले होते. त्यांची कार वेगाने चालली होती. त्यामुळे ती पलटी होऊन हा अपघात घडला. अपघाताच्या वेळी गाडीचा वेग २०० ते ३०० किलोमीटर होता.

हरदेव सिंग यांच्यासोबत त्यांचे जावई अवनीत यांचाही मृत्यू झाला. तर दुसरे जावई सन्नी जखमी झाले. त्यांची कार सन्नी चालवत होते. बाबा यांचे संपूर्ण कुटुंब आता कॅनडात आहे.

टोरंटो येथे जूनमध्ये दुसरा निरंकारी आंतरराष्ट्रीय समागम आयोजित केला आहे. यंदाच्या समागमाची संकल्पना मानवता आहे. त्याची तयारीही जोरदार सुरू असताना हा अपघात घडला.

बाबा हरदेव सिंग हे निरंकारी बाबा म्हणून प्रख्यात होते. १९८० मध्ये त्यांचे वडील गुरुबचन सिंग यांच्याकडून प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. २३ फेब्रुवारी १९५४ मध्ये बाबांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रोसरी पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यानंतर १९६३ मध्ये पटियालाच्या यादविंद्र पब्लिक स्कूलमध्ये ते दाखल झाले.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिल्ली विद्यापीठात त्यांचे उच्चशिक्षण झाले. १९७१ मध्ये ते निरंकारी सेवा दलात प्राथमिक सदस्य म्हणून सामील झाले. १९७५ मध्ये दिल्लीच्या वार्षिक निरंकारी संमेलनात त्यांचा विवाह माता सावींद्र कौर यांच्याशी झाला.

निरंकारी मिशनच्या जगभरात २७ देशांमध्ये १०० शाखा आहेत. तसेच कोटय़वधी भक्त आहेत. दरम्यान, मंडळाने सूचना केल्याशिवाय अनुयायांनी दिल्लीला येऊ नये, असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे प्रवक्ते कृपा सागर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *