आंब्याचा पॅनकेक
साहित्य – 1 वाटी कणीक, पाऊण वाटी मिक्सरवर बारीक केलेला आंब्याचा रस, 2-3 चमचे साखर, पाव चमचा मॅँगो किंवा आइस्क्रीेम इसेंस, दीड चमचा ताजी बेकिंग पावडर आणि बटर.
मँगो सिरपसाठी साहित्य – अर्धी वाटी आंब्याचा रस, पाव वाटी साखर, पाव चमचा मँगो किंवा आइस्क्रीम इसेंस.
कृती – सिरपची- आंब्याचा रस आणि साखर एकत्र करून जाड बुडाच्या पातेल्यात घालून गरम करायला ठेवावं. अधूनमधून ढवळत राहावं. सिरपला उकळी येऊन थोडं घट्टसर झालं की गॅस बंद करावा.
पॅनकेक – कणकेत बेकिंग पावडर मिक्स करावी. आमरसात साखर आणि इसेंस घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावं. कणकेत आमरसाचं लागेल तेवढं मिश्रण घालून फेरणीनं मिश्रण एकजीव करावं. पाणी घालून सहज पसरवता येईल इतपत मिश्रण सरसरीत करावं. नॉनस्टीक पॅनवर जाडसर पॅनकेक घालावा व वरून झाकण ठेवावं. पॅनकेक खालून लालसर झाला की बटर सोडून उलटवावा. दोन्ही बाजूनी पॅनकेक तयार झाला की गॅस बंद करावा. हा पॅनकेक मँगो सिरप आणि बटरबरोबर खायला द्यावा.
झटपट कोथिंबीर वडी
साहित्य – अर्धी वाटी बेसन, 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी तांदूळपिठी किंवा ज्वारीचं पीठ, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा वाटलेली मिरची, 1 चमचा लाल तिखट, मीठ, 1 चमचा तीळ, फोडणीसाठी तेल आणि हवा असेल तर पाव चमचा सोडा.
कृती – कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. तेल, तीळ आणि फोडणीचं साहित्य वगळून इतर सर्व साहित्य एकत्र करावं, 1 चमचा गरम तेलाचं मोहन घालावं. अगदी थोडं पाणी घालून गोळा मळून घ्यावा. साधारण दीड दोन इंच रुंद गोल रोल वळून घ्यावा. कुकरच्या भांडय़ात ठेवून हा रोल वाफवून घ्यावा. थंड झाल्यावर त्याचे जाडसर स्लाईसेस कापून घ्यावेत. 1-2 चमचे तेलात हिंग मोहरीची फोडणी करून त्यात या वडय़ा परतून घ्याव्यात. चालणार असेल तर तेलात डिप फ्राय केलेल्या वडय़ाही छान लागतात. या वडय़ा गरम तसंच थंडही छान लागतात. नुसत्या डब्यात नास्त्यासाठी किंवा जेवणालाही या वडय़ांमुळे चव येते!