श्रीहरी अणे यांनी अखंड महाराष्ट्राची मागितली माफी

श्रीहरी अणे यांनी अखंड महाराष्ट्राची मागितली माफी

महाराष्ट्र राज्याचा नकाशा असलेला केक आपल्या वाढदिवशी कापून विदर्भ वेगळा केल्याबद्दल विदर्भ राज्यासाठी आंदोलन चालवणारे नेते आणि माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी अखंड महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

‘महाराष्ट्र १’ या वृत्तवाहिनीवरील, विदर्भ राज्यावरील चर्चेत काँग्रेसचे आमदार आणि कट्टर अखंड महाराष्ट्रवादी युवानेते नितेश राणे यांनी श्रीहरी अणे यांना आडव्या हाताने घेतले तेव्हा अणे यांनी नाक घासून, कान पकडून महाराष्ट्राची माफी मागितली.

तब्बल २० दिवसांनी उपरती झालेले अणे यांनी जे झाले ते अयोग्य होते, असे कबूल केले आणि जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागतो, असे ते म्हणाले.

गेल्या महिन्यात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवरून राजकारण तापले असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी ‘महाराष्ट्राचे चार तुकडे करा’ असे सुचवले होते. त्यावर मोठे वादळ उठले.

‘तुकडे करायला महाराष्ट्र हा काय केक वाटला का? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. १३ एप्रिल या आपल्या वाढदिवशी महाराष्ट्राची प्रतिकृती असलेला केक कापून अणे यांनी जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांच्या अंगाशी आले.

महाराष्ट्राच्या केकवरील विदर्भाचा नकाशा कापून अणे तो वेगळा करीत असल्याचा व्हीडियो व्हायरल झाला आणि राज्यात संतापाची एकच लाट उसळली. विदर्भातील अनेक लोकांना अणे यांचा हा बालिशपणा आवडला नाही. त्यांची लोकप्रियता एकदम कमी झाली. महाराष्ट्र दिनी त्यांनी नागपुरात विदर्भाचा झेंडा फडकवला त्या कार्यक्रमाला मोजून ४० जण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *