माझं माहेर विदर्भातलं. आता मी मुंबईत आहे. पण मुंबईतही मी माङया माहेरी असलेल्या खाण्या-पिण्याच्या विशिष्ट सवयी आवजरून जपल्या आहेत. माङया मुंबईमधल्या मैत्रिणींना तर माङया काही गोष्टींचं फारच अप्रूप आणि कौतुक वाटायचं. सुगडय़ातलं पन्हं ही कल्पनाच माङया मैत्रिणींना एकदम हटके वाटली होती. इथे मुंबईतल्या लोकांना हे नवीन होतं. पण विदर्भात तर आमच्या घरी ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. चैत्र गौरीच्या हळदीकुंकवाला आम्ही गूळ घालून केलेलं कैरीचं पन्हं हे मातीच्या सुगडय़ातूनच देतो.
कैरीच्या पन्ह्यासोबतच ज्वारीच्या कण्यांचे उकडलेले मुठ्ठे, भट्ट गोळे, सातूचं पीठ हे पदार्थही आमच्या विदर्भात एकदम फेमस. आता माङया मुंबईतल्या शेजारच्या मैत्रिणींनाही माङया विदर्भ स्टाइल खाण्या-पिण्याची चटक लागली आहे. आता तर त्या त्यांच्या घरीही हे पदार्थ बनवतात. आणि मला चवीला आणून देऊन ‘जमलं का तुङया विदर्भासारखं?’ असंही आवजरून विचारतात.
कैरीचे पन्हे
साहित्य – दोन कै:या, गूळ किंवा साखर आणि चिमूटभर मीठ.
कृती – कै:या सोलून घेऊन थोडय़ा पाण्यात उकळवून घ्याव्यात. थंड झाल्या की गर काढून तो रवीनं घुसळून घेऊन त्यात गरजेप्रमाणो पाणी, साखर किंवा गूळ आणि चवीप्रमाणो मीठ टाकून मातीच्या सुगडय़ात ठेवून थंड करून प्यावं.
सातू पीठ
साहित्य – अर्धा किलो गहू, अर्धा किलो डाळ्या, साखर, गूळ आणि चवीला मीठ.
कृती – गहू स्वच्छ धुवून वाळवावेत. चण्याच्या डाळ्या घ्याव्यात. हे दोन्ही पदार्थ मिक्सर किंवा गिरणीतून दळून आणावे. खाण्याच्या वेळी जेवढं लागेल तेवढं घेऊन त्यात चवीप्रमाणो गूळ किंवा साखर घालावी. चिमूटभर मीठ घालून पाण्यात थोड लापसीसारखं भिजवून मग खावं. सातूचं पीठ करताना गहू व डाळ्या भाजून दळावे. हा पदार्थ उन्हाळ्यात खातात. पोटासाठी अतिशय थंड असणारा हा पदार्थ शरीराला एकदम पोषक असतो.
ज्वारीच्या कण्याचे उकळलेले मुठ्ठे
साहित्य – धुवून वाळवलेली 1 किलो ज्वारी, चवीला मीठ , ताक आणि तेल.
कृती – 1 किलो ज्वारी साळ गिरणीतून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. दोन वाटय़ा पीठ घेतलं तर 2 चमचे तेल त्या पिठात टाकावं. चवीप्रमाणो मीठ टाकून मुठ्ठे मुठीनी वळवता येतील अशा पद्धतीनं पीठ भिजवून गोल गोल मुठ्ठे वळावे. मुठ्ठे कुकरच्या डब्यात ठेवून उकळून घ्यावे. हे मुठ्ठे कुकरमध्ये तीन शिट्टय़ांत शिजतात. किंवा पातेल्यात पाणी टाकून त्यावर चाळणी ठेवून हे मुठ्ठे त्यातही उकळता येतात. हे मुठ्ठे मीठ टाकलेल्या ताकासोबत खातात. ताकाच्या कढीसोबतसुद्धा हे मुठ्ठे एकदम चविष्ट लागतात.
भट्ट गोळे
साहित्य – 1 वाटी चण्याची डाळ, अर्धा पाव चिवडीची भाजी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, हळद, मीठ, लसूण आणि एक चमचा अद्रक पेस्ट.
कृती – चण्याची डाळ आदल्या रात्री भिजत घालावी. दुस:या दिवशी ती छान धुवून तिला मिक्सरमधून रवाळ वाटावी. त्यात चिवडीची भाजी बारीक कापून मिसळून घ्यावी. त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या ओवा, हळद, अद्रक पेस्ट, जिरे आणि चवीप्रमाणो मीठ टाकून सर्व मिश्रण छान एकजीव करावं. हातानं गोल-गोल गोळे करून हे गोळे कुकरच्या डब्यात ठेवून तीन शिट्टय़ात उकडून घ्यावेत. खायच्या वेळेस भट्ट गोळे गोल कापून गरम कढीसोबत खावे फार छान लागतात. मुठ्ठे आणि भट्ट गोळे हे दोन्ही पदार्थ विदर्भात खास करून नागपंचमीला करतात. या दिवशी ताकात मीठ टाकून किंवा दह्यासोबत खातात.