उन्हाळ्याची चाहूल लागली की मुलांची खाण्याची इच्छा कमी होते. त्यांना सारखं काहीतरी थंड खावं-प्यावंसं वाटतं. पण याचा अर्थ त्यांना रोज उठून आइस्क्रीम आणि कोल्डड्रिंक्स द्यावेत असं नाही. उलट त्यांच्या आहारात थंड गुणांच्या पदार्थाचा आवजरून समावेश करावा. उदा. काकडी पोहे आणि चिकू शिरा. या पदार्थामुळे त्यांच्या चवीत बदलही होईल आणि त्यांच्या पोटाला थंडावाही मिळेल.
सध्या बाजारात चिकू-काकडय़ा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे नुसते चिकू-काकडी तर मुलांना द्यावेच पण असे विविध पदार्थ बनवून दिले तर चव बदलल्यामुळे ते मुलांनाही आवडतील.
काकडी पोहे
साहित्य- 3 वाटय़ा पातळ पोहे, 1 मध्यम आकाराची काकडी, 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, प्रत्येकी 2 चमचे खोवलेलं खोबरं, दाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कैरी, कैरी नसेल तर लिंबू, मीठ, 2 चमचे पिठी साखर, फोडणीचं साहित्य आणि छोटा बारीक चिरलेला कांदा.
कृती- पोहे कुरकुरीत होईर्पयत भाजून घ्यावेत. 2-3 चमचे तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि मिरच्यांचे मध्यम आकाराचे तुकडे घालून खमंग फोडणी करून घेऊन ती कुरकुरीत पोह्यांवर घालावी. ही फोडणी पोह्यांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावी. एका डब्यात फोडणी घातलेले पोहे घेऊन त्यावर दाण्याचे कूट घालावे. दुस:या डब्यात कांदा, काकडी, कोथिंबीर, कैरी, खोबरं आणि कोथिंबीर यांचं मिश्रण करून द्यावं. हे भाज्यांचं मिश्रण मुलांना अगदी आयत्या वेळेवर पोह्यांमध्ये मिक्स करायला सांगावं. हे चविष्ट थंड पोहे मुलांना डब्यासाठी खूप आवडतात आणि पोटालाही थंड असतात.
चिकू शिरा
साहित्य- दीड वाटी रवाळ कणीक (रवाळ कणीक नसेल तर 1 वाटी कणीक आणि अर्धी वाटी बारीक रवा घ्यावा), अर्धी वाटी तूप, 2 गोड चिकू, 2 चमचे बारीक चिरलेला गूळ किंवा साखर आणि दूध (ऐच्छिक).
कृती- कणीक तुपावर खमंग वास येईर्पयत भाजून घ्यावी. तीन वाटय़ा दूध किंवा पाणी गरम करावं. त्यातलं अर्धी वाटी पाणी वगळून बाकीचं भाजलेल्या कणकेत घालून भराभर ढवळावं. मिश्रणाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत. झाकण ठेवून मिश्रण बारीक गॅसवर शिजू द्यावं. मिश्रण शिजल्यावर त्यात बारीक चिरलेला चिकू घालून ते ढवळावं. 2-3 मिनिटं शिजू द्यावं. चव बघून आवश्यक तेवढा गूळ किंवा साखर घालावी. गूळ विरघळला की गॅस बंद करावा.